रुग्णवाहिका चालकांचा मृत्यूसोबत प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:18 AM2021-04-27T04:18:02+5:302021-04-27T04:18:02+5:30
परभणी : कोरोनाच्या संसर्ग काळात रुग्णवाहिका चालकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून बाधित रुग्णांना वेळेत दवाखान्यापर्यंत ...
परभणी : कोरोनाच्या संसर्ग काळात रुग्णवाहिका चालकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून बाधित रुग्णांना वेळेत दवाखान्यापर्यंत पोहोचविणाऱ्या रुग्णवाहिका चालकांचा दररोज मृत्यूसोबत प्रवास होत आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. या काळात कोरोना योद्धे म्हणून अनेकजण मदतीसाठी पुढे आले असून, त्यात रुग्णवाहिका चालकांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. जिल्ह्यात एकूण ५५ रुग्णवाहिका असून, त्यापैकी १३ रुग्णवाहिका कोरोनासाठी काम करतात. या रुग्णवाहिकांवर असलेल्या चालकांना मात्र विना सुट्टी काम करावे लागत आहे. केवळ रुग्णवाहिका चालविणे एवढ्यापुरतेच या लोकांचे काम मर्यादित नसून, प्रसंगी रुग्णांना दवाखान्यापर्यंत नेणे, त्यांना उचलून वॉर्डात दाखल करणे ही कामेदेखील चालक मंडळी करीत आहेत. या चालकांना सुरक्षा कीट उपलब्ध असले तरी कोरोनाचा धोका मात्र कायम आहे. केवळ रुग्णवाहिका चालविणे ही या चालकांची जबाबदारी आहे. मात्र, बहुतांश वेळा बाधित रुग्णाजवळ कोणीही येत नाही. अशा वेळी या रुग्णांचे सिटी स्कॅन रिपोर्ट स्वतः आणणे, ऑक्सिजन लागणाऱ्या रुग्णांना उचलून नेणे ही कामे चालकांना करावी लागतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेकडे मात्र कोणीही फारसे गांभीर्याने पाहत नाहीत. त्यांच्या या सेवेची दखल घेण्याची गरज आहे.
कोरोनाबाधित रुग्णांची वाहतूक करताना प्रशासनाकडून सुरक्षा कीट आणि सॅनिटायझर दिले आहे; परंतु या वेळेस पीपीई कीट मात्र उपलब्ध झाले नाही. चालकांसाठी पीपीई कीट देणे आवश्यक आहे.
दीपक लांडगे
कोरोना रुग्णांना दवाखान्यापर्यंत नेत असताना रुग्णालयातून एखादा वॉर्डबॉय, डॉक्टर मदतीसाठी देणे आवश्यक आहे. मात्र, एकही कर्मचारी मदतीसाठी नसल्याने आम्हाला जीव धोक्यात घालून रुग्णांना वॉर्डापर्यंत पोहोचावे लागते. त्यामुळे रुग्णांसोबत मदतीला एक कर्मचारी सोबत देणे आवश्यक आहे.
अजहर खान
कोरोनाबाधित रुग्णांना दवाखान्यात पोहोचविताना अनेक वेळा या रुग्णांच्या जवळ कोणीही येत नाही. तसेच दवाखान्यात बेड शिल्लक नसतो. तेव्हा आमची मोठी अडचण होते. त्यामुळे रुग्णांना कोविड केअर केंद्रातून कोविड रुग्णालयात रेफर करताना बेड शिल्लक असल्याची खात्री करूनच रेफर करणे गरजेचे आहे.
केशव यादव
५५ जिल्ह्यातील एकूण रुग्णवाहिका
१३ रुग्णवाहिका कोविडसाठी
१३ चालक
४२ रुग्णवाहिका नॉनकोविडसाठी
४२ चालक