परभणीत हाकेंची पंचाईत! भाषणाला उभे राहताच आंबेडकरी कार्यकर्त्याने रोखलं अन् जागेवरच सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 19:21 IST2025-01-09T19:07:17+5:302025-01-09T19:21:02+5:30
आंबेडकरी कार्यकर्त्याने हाके यांना भाषणापासून रोखत तुम्ही भाजप आणि मुख्यमंत्र्यांचे हस्तक असल्याचा आरोप केला.

परभणीत हाकेंची पंचाईत! भाषणाला उभे राहताच आंबेडकरी कार्यकर्त्याने रोखलं अन् जागेवरच सुनावलं
Laxman Hake Parbhani: संविधानाच्या प्रतिमेची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा अटकेनंतर न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. या घटनेनंतर विविध नेत्यांनी परभणीत जात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केल्यानंतर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके हेदेखील आज सूर्यवंशी कुटुंबियांच्या भेटीसाठी गेले होते. मात्र तिथं गेल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना एका आंबेडकरी कार्यकर्त्याने हाके यांना भाषणापासून रोखत तुम्ही भाजप आणि मुख्यमंत्र्यांचे हस्तक असल्याचा आरोप केला.
"ज्या वाल्मीक कराडमुळे बीडच्या मस्साजोगमध्ये अशोक सोनवणे या बौद्ध बांधवावर हल्ला झाला त्याची बाजू घेण्यासाठी तुम्ही मोर्चा काढता. तुम्ही मुख्यमंत्र्यांचे हस्तक आहेत," असा आरोप करत एका तरुणाने लक्ष्मण हाके यांना भाषण करण्यापासून रोखले. त्यानंतर हाके यांनी मी भाजपचा नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं. यावेळी काहीसा गोंधळ निर्माण झाल्यानंतर मध्यस्थी करण्यासाठी सचिन खरात उठले आणि खरात यांनीही हाके यांना तुम्ही वाल्मीक कराडची बाजू घेऊ नका, असं सुनावलं.
"भाजपच्या लोकांनी मंडल आयोगाला विरोध केला होता. भाजपच महाराष्ट्रात बहुजनांमध्ये वाद लावत आहेत. त्यामुळे तुम्ही भाजपची आणि वाल्मीक कराडची बाजू घेऊ नका," असं सचिन खरात यांनी लक्ष्मण हाकेंना उद्देशून म्हटलं.
सोमनाथ सूर्यवंशीचा कसा झाला मृत्यू?
परभणी शहरातील ११ डिसेंबर रोजी झालेल्या आंदोलन प्रकरणात नवा मोंढा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी (३६) यांस ताब्यात घेतले होते. त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाली होती. १५ डिसेंबर रोजी सकाळी न्यायालयीन कोठडीत सोमनाथ याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीमध्ये पोलिसांनी केलेल्या अमाणूष मारहाणीमुळेच मृत्यू झाला असून त्यांची हत्याच झाली आहे, असा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइं (आ)चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलेला आहे.