भरधाव ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाला चिरडले; अपघातानंतर चालक ट्रक सोडून पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 18:13 IST2024-10-08T18:12:41+5:302024-10-08T18:13:41+5:30
गावाकडे जाण्यासाठी बसस्थानकाकडे जाताना ट्रकने चिरल्याने झाला जागीच मृत्यू

भरधाव ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाला चिरडले; अपघातानंतर चालक ट्रक सोडून पसार
- सत्यशील धबडगे
मानवत: शहरातील महाराणा प्रताप चौक परिसरातील मानवत ते पाथरी राष्ट्रीय महामार्गावर
रस्ता ओलांडणाऱ्या ६५ वर्षीय वृद्धाला भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने चिरडले. यात वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. नागोराव गंगाराम जोहरुले असे मृताचे नाव आहे.
तालुक्यातील कोथाळा येथील नागोराव गंगाराम जोहरुले (वय ६५) हे तहसील कार्यालयातील खाजगी कामासाठी मंगळवारी सकाळी मानवतला आले. तहसील कार्यालयातील काम झाल्यानंतर दुपारी दीड वाजेच्या सुमारास मानवत ते पाथरी राष्ट्रीय महामार्गावरून गावाकडे जाण्यासाठी बसस्थानकाकडे निघाले. एमआरएफ शोरूम समोरून रस्ता ओलांडताना पाथरीहून परभणीला जाणाऱ्या भरधाव वेगातील ट्रकने (क्रमांक एम एच १६ सीसी ७४७५) नागोराव यांना चिरडले. यात नागोराव जोहरुले यांचा जागीच मृत्यू झाला.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदीप बोरकर, पो उ नि किशन पंतगे, पोलीस हवालदार शेख मुनू नारायण सोळंके, नरेंद्र कांबळे सुनीलसिंह बावरी यांनी अपघातस्थळी धाव घेत मृतदेह ग्रामीण रुग्णालयात रवाना केला. या प्रकरणी गंगाधर जोहरूले यांच्या तक्रारीवरून ट्रक चालकाच्या विरोधात मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किशन पतंगे हे करत आहेत.