ठेचा-भाकरी खाऊन स्वाभिमानीचे लक्षवेधी आंदोलन
By राजन मगरुळकर | Published: September 12, 2024 04:29 PM2024-09-12T16:29:16+5:302024-09-12T16:29:40+5:30
सॅम्पल सर्व्हे रद्द करण्याची जिल्हा प्रशासनाकडे मागणी
परभणी : जिल्ह्यात शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीचा सॅम्पल सर्व्हे न करता व्यक्तिगत सर्व्हे करून विमा कंपनीने बाधित पिकांची संरक्षित रक्कम आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अनोखे आंदोलन केले. गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठेचा-भाकरी खाऊन आंदोलन केले.
जिल्ह्यात मागील दहा दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी, ओढे, नाल्या लगतच्या शेतजमिनी संपूर्णपणे खरडून गेल्या. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले. काही पिके आडवी झाली. अशा शेतजमिनीचा सॅम्पल सर्व्हे न करता व्यक्तिगत सर्व्हे करून विमा कंपनीने बाधित पिकांची संरक्षित रक्कम आठ दिवसांच्या आत बँक खात्यात जमा करण्याचे आदेशित करावे तसेच उर्वरित पिकांची या पावसामुळे उत्पन्नात झालेली घट पाहता त्यात मिड सीजन अलोटेडनुसार उर्वरित उभ्या पिकांचा सर्व्हे करून त्यांना अग्रीम रक्कम द्यावी, अशा मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हे आंदोलन पुकारले होते. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, रामप्रसाद गमे, गजानन तुरे, दत्ता परांडे, आदिनाथ लवंदे, सुधाकर खटिंग, नामदेव काळे, पंडित भोसले, दिगंबर पवार, मुंजाभाऊ लोंढे, प्रसाद गरुड, राम गोळेगावकर, हनुमंत आमले यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते.