मराठा आरक्षणाचा ‘आनंदोत्सव’; आरक्षण लढ्यास परभणी जिल्ह्यातून मिळाली खंबीर साथ

By मारोती जुंबडे | Published: January 27, 2024 06:48 PM2024-01-27T18:48:01+5:302024-01-27T18:49:28+5:30

कुठे गुलाल उधळून तर कुठे फटाक्याचे आतिषबाजी करण्यात आली.

'Anandotsav' of Maratha reservation; Sacrifice, assembly and reservation struggle received support from Parbhani district | मराठा आरक्षणाचा ‘आनंदोत्सव’; आरक्षण लढ्यास परभणी जिल्ह्यातून मिळाली खंबीर साथ

मराठा आरक्षणाचा ‘आनंदोत्सव’; आरक्षण लढ्यास परभणी जिल्ह्यातून मिळाली खंबीर साथ

परभणी : मराठा समाजाने आज नवी मुंबई वाशी येथे उडवलेला आरक्षण विजयाचा गुलाल हा जिल्ह्यासाठीही एक ऐतिहासिक क्षण ठरला. कारण या निर्णायक लढ्यात जिल्ह्यातील तरुणांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी बलिदान, मनोज जरांगे पाटलांच्या जिल्ह्यात झालेल्या विविध सभा आणि समाज बांधवाकडून मिळालेली आंदोलन लढ्यास सकारात्मक प्रतिसादाने हा लढा अधिकच तीव्र झाला. परिणामी सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात शनिवारी अध्यादेश काढल्यामुळे या निर्णयाचे परभणी शहरासह जिल्ह्यात स्वागत करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कुठे गुलाल उधळून तर कुठे फटाक्याचे आतिषबाजी करण्यात आली.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी अंतरवाली सराटीत जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू होते. परंतु सप्टेंबरमध्ये उपोषणकर्त्यावर पोलिसांकडून अमानुष लाठीमार केला. त्यानंतर हा राज्यभर प्रश्न चर्चेला गेला. यानंतर सर्वसामान्य मराठा समाजासह लोकप्रतिनिधी, समाज माध्यमांनी अंतरवाली सराटीकडे धाव घेतली. यात परभणी जिल्हाही अग्रेसर होता. या घटनेनंतर परभणीत २ सप्टेंबर २०२३ रोजी या घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन केले. तर ३ सप्टेंबरला हल्ल्याच्या निषेधार्थ शहर कडकडीत बंद ठेवले होते. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचाही दौरा परभणी जिल्ह्यात झाला. परभणी, सोनपेठ, सेलू व गंगाखेड येथे त्यांच्या मोठमोठ्या सभा झाल्या. त्यानंतर आंतरवाली सराटीकडे जिल्ह्यातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने येण्याचे आवाहन केले. या आवाहनाला समाज बांधवांनी प्रतिसाद दिला. त्याचबरोबर २० जानेवारीपासून मुंबईकडे निघाल्या विजयी रथयात्रेत जिल्ह्यातील अनेक गावांमधूनही मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाला. या सर्वाचा परिणाम पाहता पाच महिन्यानंतर म्हणजेच २७ जानेवारीला राज्य शासनाने मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून शासन निर्णयाच्या प्रति मनोज जरांगे पाटील यांच्याकडे मुंबईत सुपूर्द केल्या. त्यानंतर जिल्ह्यात ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीसह गुलालाची उधळण करत आरक्षणाचा आनंद उत्सव साजरा केला.

६० दिवस सुरु राहिले साखळी उपोषण 
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीही आंतरवाली सराटीकडे धाव घेत आंदोलनस्थळी जरांगे पाटील यांच्याशी भेट घेऊन चर्चा करत आपला पाठिंबा जाहीर केला. परभणी शहरातील आंदोलनाचे लोण ७ सप्टेंबरपासून ग्रामीण भागात पोहोचले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कडकडीत बंद पाळून मोर्चा काढण्यात आला. यामध्ये मराठा समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला. त्यानंतर ८ सप्टेंबर २०२३ रोजी शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर २७ ऑक्टोबर २०२३ पासून परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सकल मराठा समाजाने साखळी उपोषण सुरू केले. विशेष म्हणजे परभणीच्या इतिहासात सर्वाधिक ६० दिवस हे उपोषण सुरू राहिले. ग्रामीण भागातील मराठा समाज बांधवातून मोठा प्रतिसाद मिळाला.   

चार सभांनी ढवळून निघाले वातावरण 
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा लढा तीव्र केला. त्यानंतर अंतरवाली सराटी येथे होणाऱ्या निर्णायक सभेसाठी परभणी जिल्ह्यातील मराठा समाजाने लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे, यासाठी मोठमोठ्या सभा घेतल्या. यामध्ये परभणी, सोनपेठ, गंगाखेड व सेलू येथील सभेने जिल्हा ढवळून निघाला. परभणीकरांना आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी या चार सभा महत्त्वाच्या ठरल्या.

पाच जणांना गमवावा लागला जीव 
मराठा आरक्षणासाठी आंदोलनाच्या माध्यमातून लढा तीव्र होत असताना पाथरीतील वडी येथील सोमेश्वर शिंदे या तरुणाने २३ ऑक्टोबर २०२३ रोजी आरक्षणसाठी बलिदान दिले होते. परभणीतील पोखर्णी नृसिंह येथील नागेश रंगनाथ बुचाले (३७), सनपुरी येथील सचिन रामराव शिंदे (३४), आर्वीतील सुनील कदम (३२)व जिंतूर तालुक्यातील बापूराव उत्तमराव मुळे (३९) यांनी आरक्षणासाठी आपले बलिदान दिले होते.

रॅलीसह फटाक्यांची आतिषबाजी 
मुंबईकडे निघालेल्या मराठा आरक्षण विजय रॅली वाशीत पोहोचल्यानंतर राज्य सरकारने तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली. त्यानंतर २७ जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभास्थळी येत सर्व मागण्या मान्य करत शासन निर्णयाच्या काही प्रति मनोज जरांगे पाटील यांना सुपूर्द केल्या. त्यानंतर विजयी सभा निघाली. त्यानंतर परभणी शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी मराठा समाज बांधवांनी रॅली काढत गुलालाची उधळण केली. त्याचबरोबर फटाक्यांची आतिशबाजी करत आनंद उत्सव साजरा केला.

Web Title: 'Anandotsav' of Maratha reservation; Sacrifice, assembly and reservation struggle received support from Parbhani district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.