पाथरी येथील आनंदवन आंतरराष्ट्रीय शाळा बोगस; संस्था चालकांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 06:52 PM2019-06-15T18:52:49+5:302019-06-15T18:54:45+5:30
दोन वर्षानंतर कारवाई झाल्याने 164 विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात
पाथरी (परभणी ) : पाथरी येथील आनंदवन इंटरनॅशनल स्कूल या शाळेला शासनाची मान्यता नाही. असे असताना बनावट दस्तऐवज वापरून अनधिकृत आणि नियमबाह्य शाळा चालवून पालक आणि विद्यार्थ्यांचे फसवणूक केल्या प्रकरणी पाथरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अधिकारी विश्वास खोगरे यांच्या फिर्यादीवरून संस्था चालकांवर शनिवारी (दि.१५ ) गुन्हा दाखल करण्यात आला. गेली दोन वर्षे बोगस शाळा चालवली जात असताना शिक्षण विभाग मात्र चौकशी करत राहिल्याने शाळेत प्रवेश घेतलेल्या 164 विद्यार्थीचे भवितव्य धोक्यात आले आहे.
डॉक्टर सलीम मेडिकल एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेची पाथरी येथे आनंदवन इंटरनॅशनल स्कूल ही इंग्रजी माध्यमाची शाळा शहरात 2015 / 16 या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आली. सध्या या शाळेमध्ये पहिली ते आठवीपर्यंतचे इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू आहेत. सदरील शाळेला शासनाची मान्यता नसल्याची तक्रार पाथरी येथील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल साळवे यांनी शिक्षणाधिकारी परभणी यांच्याकडे करत अनाधिकृत शाळा सुरू असल्या प्रकरणी संबंधितावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर शिक्षण अधिकारी परभणी यांच्या आदेशानुसार गट शिक्षणाधिकारी पाथरी यांनी या शाळेच्या मान्यतेबाबत चौकशी करून वरिष्ठाकडे अहवाल दाखल केला होता.
29 जानेवारी 2019 रोजी शिक्षणाधिकारी परभणी यांनी पाथरी गटशिक्षणाधिकाऱ्यांना सदरची शाळा अनधिकृत असल्यामुळे या शाळेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी प्राधिकरण करण्यात आले होते. सदर शाळेतील 164 विध्यार्थ्यांना जवळच्या मान्यता प्राप्त शाळेत समायोजित करण्याच्या लेखी सूचना शिक्षण विभागाने देऊन ही प्रवेशित केले नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्याच बरोबर शाळा स्थलांतरित मान्यता नसताना ही टी सी निर्गमित केल्याचे चौकशीत आढळून आले आहे. त्यानंतर 4 जून 2019 रोजी शिक्षण विभागाने सदर शाळा बंद करून शाळेतील 164 विद्यार्थी जवळच्या मान्यता प्राप्त शाळेत वर्ग करण्या बाबत ससंस्थेला पत्र दिले.
मात्र, संस्थेकडून कारवाई झाली नाही, त्यामुळे शनिवारी (दि. 15 ) गटशिक्षणाधिकारी विश्वास खोगरे यांनी पाथरी पोलीस ठाण्यात अनधिकृत शाळा चालवणे आणि अनधिकृत स्थलांतर प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना देणे, आणि विध्यार्थी व पालक यांची दिशाभूल केल्याची तक्रार दिली. यावरून डॉ शेख सलीम शेख अमीन यांच्यावर पाथरी पोलिस ठाण्यामध्येकलम 468, 471, 420 भा द वि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उप निरीक्षक आवेज काझी हे तपास करत आहेत.