पैसे लुबाडण्याचा बनाव आला अंगलट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:22 AM2021-08-14T04:22:08+5:302021-08-14T04:22:08+5:30
पालम तालुक्यातील ग्रामीण भागात भारत फायनान्स कंपनीकडून कर्जवाटप करण्यात आले आहे. या कर्जाचे हप्ते पाडून एजंटामार्फत वसुली केली जाते. ...
पालम तालुक्यातील ग्रामीण भागात भारत फायनान्स कंपनीकडून कर्जवाटप करण्यात आले आहे. या कर्जाचे हप्ते पाडून एजंटामार्फत वसुली केली जाते. मागील सहा महिन्यांत शिरपूर ते केरवाडी आणि जवळा ते पालम या रस्त्यावर फायनान्स कंपनीच्या एजंटाला अडवून मारहाण करून पैसे लुटल्याचे गुन्हे पालम पोलिसात दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांचा अजूनही तपास सुरू आहे. याच दरम्यान १० ऑगस्ट रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास कर्जाची वसुली करून परत येताना भारत फायनान्स कंपनीच्या एजंटाला अडवून ४ जणांनी १ लाख २५ हजार रुपये रोख, मोबाइल, लॅपटॉप व साहित्य लुटल्याची तक्रार लातूर येथील रहिवासी असलेल्या एजंट सचिन आडे याने दिली होती. या घटनेचा तपास करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे यांनी पथक नेमून उपनिरीक्षक विनोद साने, जमादार बलभीम पोले, गोविंद चुडावकर यांना घटनास्थळी पाठवले. या ठिकाणावरून दुचाकी क्रमांक एमएच २४ - एएम ८३७९, बॅग, कागदपत्र आदी साहित्य जप्त करण्यात आले. यानंतर पोलिसांनी एजंट सचिन आडे यांच्याकडून घटनेची माहिती घेत असताना माहितीत तफावत व संशय आल्याने पोलीस खाक्या दाखवतात आडे याने आपली कोणत्याही प्रकारची लूट झाली नाही. ही फिर्याद खोटी असल्याचे सांगितले. हे पैसे वसूल करून मी खर्च केले होते. कंपनीचे पैसे भरावे लागणार होते. ते खर्च केल्याने माझ्याजवळ पैसे शिल्लक राहिले नाहीत. हा प्रकार झाकण्यासाठी मी खोटा बनाव केल्याचे कबूल केले. त्यामुळे या घटनेतील फिर्यादी हाच आरोपी निघाला असून, त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वीही सचिन आडे याने जवळा ते पालम रस्त्यावर लूट झाल्याची फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे पोलीस या दोन्ही घटनांची कसून चौकशी करीत आहेत.
हातउसने पैसे देण्यासाठी शक्कल
फायनान्स कंपनीचे एजंट कर्ज हप्ता वसुली करण्यासाठी नेहमी ग्रामीण भागात फिरतात. विविध दिवस ठरवून वसुली केली जाते. वसुलीचे पैसे एजंटाकडे जमा करून पुन्हा कंपनीच्या कार्यालयात जमा करावे लागतात. हेच जमा केलेले पैसे कंपनीकडे जमा न करता हातउसने पैसे फेडण्यासाठी आडे याने वापरले होते. पैसे जमा करण्याचा दिवस जवळ येत असूनही त्याच्याकडे पैसे उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे आपण अडचणीत येऊ या भीतीपोटी त्याने लुटल्याचा बनाव करून शक्कल लढवली. मात्र यात तोच अलगद सापडला.
पालम पोलिसात लुटल्याची फिर्याद देताना एजंटचे हावभाव, बोलण्यातील विसंगती, घटनाक्रम याची माहिती घेत असताना ठाणे अंमलदार बलभीम पोले यांना फिर्यादीचा संशय आला. यानंतर पोले यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितली. पोलिसांनी शांत राहत विचारपूस करून घटनास्थळी भेट देईपर्यंत काही केले नाही. यानंतर तपास वेगात करून फिर्यादीवरच फासे पलटविले व गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी सचिन आडे याला नोटीस देऊन सोडले आहे. न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर परवानगी घेऊन पुढील कारवाई केली जाणार आहे.