जनावरांची चोरी करणारी सराईत टोळी गंगाखेडमध्ये जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 06:58 PM2020-02-10T18:58:06+5:302020-02-10T19:01:32+5:30
पोलीसांच्या सतर्कतेने चौघे गजाआड
गंगाखेड: जनावरांची चोरी करून रात्रीच्या वेळी त्याची इतरत्र वाहतूक करणारी चौघांची टोळी रात्रगस्तीवरील पोलीसांच्या सतर्कतेने गजाआड झाली. परळी तालुक्यातुन चोरून आणलेली दोन जनावरे मालकाला सुखरूप परत मिळाली आहेत.
गंगाखेड पोलीस ठाण्याचे सपोनि विकास कोकाटे, पो.ना. राजेश चक्कर, सुग्रीव सावंत आदी कर्मचारी सोमवारी ( दि. १० ) पहाटे शहरात रात्रगस्तीवर होते. पहाटे ३:१० वाजेच्या सुमारास त्यांना एम.एच २४ जे ८१४१ क्रमांकाचे पिकअप पालम रोडवरील उड्डाणपूल परिसरात आढळून आले. सपोनि कोकाटे यांनी पिकअप चालक जिलानी खाजामिया खुरेशी ( रा. राणीसावरगाव ) सह त्यातील शेख फरीद शेख महेमुद ( रा.पांगरी ता.गंगाखेड ) , ग्यानू महिपती पवार ( रा. पालम ) , राजू किशन काळे ( केरवाडी ता. सोनपेठ ) यांना विचारपूस केली. यावेळी वाहनांत असलेल्या बैल व म्हशीबाबत पोलिसांनी विचारले असतात त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
यानंतर पोलीस स्थानकात चौघांची चौकशी केली असता दोन्ही जनावरे परळी तालुक्यातील आचार्य टाकळी येथून चोरी केल्याची माहिती दिली. येथील संतोष रावसाहेब आचार्य यांनी याप्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. यामुळे पोलिसांनी मुद्देमालासह संशयित चौघांना सिरसाळा पोलीसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई सपोनि विकास कोकाटे, जमादार दीपक भारती, त्र्यंबकराव शिंदे, पो.शि. कृष्णा तंबूड आदी कर्मचाऱ्यांनी केली.