साईबाबा जन्मस्थान वादाच्या पार्श्वभूमीवर पाथरी संस्थांनकडून कृती समितीची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 05:29 PM2020-01-16T17:29:16+5:302020-01-16T17:35:36+5:30
वादावर आता पाथरी येथील साईबाबा संस्थाननेसुद्धा कंबर कसली आहे.
पाथरी : साईबाबांच्या जन्मस्थळावरून शिर्डी येथील नागरिकांकडून सुरू झालेल्या वादावर आता पाथरी येथील साईबाबा संस्थाननेसुद्धा कंबर कसली आहे. गुरुवारी ( दि. १६ ) झालेल्या एका बैठकीत विश्वस्त संजय भुसारी यांनी शिर्डीतील वादाला प्रत्युत्तर देण्यासाठी एका कृती समितीची घोषणा केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्यावर असताना पाथरीमधील साईबाबा जन्मभूमीच्या विकासासाठी १०० कोटींचा विकास आराखडा मंजूर केला होता. मात्र शिर्डीतून या विकास आराखड्याला नाही मात्र जन्मभूमी म्हणण्याला विरोध करण्यात आला. या पार्श्वभूमीवर साई संस्थानचे विश्वस्त आमदार बाबाजानी दुर्राणी, संजय भुसारी, अतुल चौधरी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुभाष ढगे ,मुंजाजी भाले पाटील व शहरातील व्यापारी, नागरिक, सर्वपक्षीय नेते यांची एक बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार बाबाजानी दुर्राणी आणि विश्वस्त संजय भुसारे यांनी साई जन्मभूमी बाबत भूमिका विशद केली. तसेच बैठकीत कृती समितीची घोषणा करण्यात आली. शिर्डी येथील नागरिकांनी केलेल्या विरोधाला कुठल्याही हद्दीमध्ये प्रत्युत्तर देण्यासाठी कृती समिती असणार आहे. या समितीमध्ये जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते आणि विश्वस्तांचा समावेश आहे. बैठकीस दादासाहेब टेंगसे , सुभाष कोल्हे , अनिल नखाते ,चक्रधर उगले ,भावना नखाते, शिवसेनेचे मुंजाभाऊ कोल्हे , अशोक गिराम, एकनाथ शिंदे , उपनगराध्यक्ष हनांन खान , गंगाधर गायकवाड , ऍड बी बी तळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन संजय कुलकर्णी यांनी केले.
जन्मभूमी बाबतच वाद का
साई बाबांची जन्मभूमी पाथरी असल्याचे अनेक पुरावे आहेत. इतके वर्ष जन्मभूमी विकासापासून वंचित राहिली, राष्ट्रपती कोविंद यांच्या भेटीनंतर साई जन्मभूमीच्या विकासाला नवीन मार्ग सापडला. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निधी मंजूर केला असताना आताच साई बाबा जन्मभूमी बाबत वाद का निर्माण केला जात आहे. शिर्डीचे नागरिक म्हणत असतील साईबाबांचा जन्म पाथरी येथे झाला नाही तर कोठे झाला हे सिद्ध करावा ?
- आमदार बाबाजानी दुर्राणी