परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणूकीसाठी ७ मतदान केंद्राची प्रारुप यादी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 07:17 PM2018-04-26T19:17:39+5:302018-04-26T19:17:39+5:30
विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक संस्था मतदार संघासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ७ मतदान केंद्राची प्रारुप यादी जाहीर केली आहे़
परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक संस्था मतदार संघासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ७ मतदान केंद्राची प्रारुप यादी जाहीर केली आहे़ या यादीवर ३० एप्रिलपर्यंत आक्षेप मागविण्यात आले असून, त्यानंतर अंतिम यादी जाहीर होणार आहे़
परभणी-हिंगोली स्थानिक संस्था मतदार संघातून १ प्रतिनिधी विधान परिषदेवर निवडून द्यावयाचा आहे़ यासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, त्या अंतर्गत मागील आठवड्यात या मतदार संघातील मतदारांची प्रारुप यादी जाहीर करण्यात आली होती़ आता मतदान केंद्रांची यादी जाहीर करण्यात आली आहे़ परभणी जिल्ह्यात परभणी, सेलू, गंगाखेड आणि पाथरी तालुक्यात मतदान केंद्र राहणार आहे तर हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली, कळमनुरी आणि वसमत हे तीन मतदान केंद्र असतील़ परभणी तालुक्यासाठी तहसील कार्यालय परभणी, सेलू व जिंतूर तालुक्यासाठी तहसील कार्यालय सेलू, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यांसाठी तहसील कार्यालय गंगाखेड, पाथरी, मानवत, सोनपेठ तालुक्यांसाठी तहसील कार्यालय पाथरी, जिल्हा परिषद हिंगोली, नगर परिषद हिंगोली आणि सेनगाव नगरपंचायतीसाठी तहसील कार्यालय हिंगोली, कळमनुरी पालिकेसाठी तहसील कार्यालय कळमनुरी आणि वसमत व औंढा नागनाथसाठी तहसील कार्यालय वसमत हे केंद्र निश्चित करण्यात आले आहे़
परभणीच्या केंद्रावर सर्वाधिक मतदान
स्थानिक संस्था मतदार संघासाठी ५०३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत़ यासाठी परभणी येथे जिल्हा परिषदेचे सदस्य, सर्व पंचायत समितीचे सभापती आणि महानगरपालिकेचे सदस्य अशा १३३ मतदारांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे़ त्याचप्रमाणे हिंगोली येथील मतदान केंद्रावर हिंगोली जि़प़चे ५७, हिंगोली पालिकेचे ३६ आणि सेनगाव नगरपंचायतीचे १७ असे ११० मतदार मतदानाचा हक्क बजावतील़ सेलूच्या मतदान केंद्रावर नगरपालिका सेलू २८ आणि जिंतूर नगरपालिका २६ असे ५४ मतदार असतील़ गंगाखेड येथील मतदान केंद्रावर गंगाखेड ऩप़ २८, पालम नगरपंचायत १९ आणि पूर्णा पालिका २३ असे ७० मतदार मतदानाचा हक्क बजावतील़ पाथरी केंद्रावर पाथरी नगरपालिका २३, मानवत नगरपालिका २२, सोनपेठ नगरपालिका २० असे ६५ मतदार, कळमनुरी केंद्रावर कळमनुरी पालिकेतील २० मतदार तर वसमत येथील मतदान केंद्रावर वसमत नगरपालिकेचे ३२ आणि औंढा नगरपंचायतीचे १९ असे ५१ मतदार मतदानाचा हक्क बजावतील़