ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी आणखी पर्यायी वाहिनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:13 AM2021-04-29T04:13:17+5:302021-04-29T04:13:17+5:30
मंगळवारी रात्री जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या वाऱ्यामुळे एका झाडाची फांदी कोसळून जिल्हा सामान्य रुग्णालयातील ऑक्सिजनची पाईपलाईन ...
मंगळवारी रात्री जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या वाऱ्यामुळे एका झाडाची फांदी कोसळून जिल्हा सामान्य रुग्णालयातील ऑक्सिजनची पाईपलाईन फुटली. यावेळी जिल्हा रुग्णालयात १४ रुग्णांना ऑक्सिजन दिले जात होते. या रुग्णांना ऑक्सिजन कमी पडून रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी या रुग्णांना इतरत्र हलवावे लागले होते. मध्यरात्री घडलेल्या या प्रकारामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही हानी झाली नाही; परंतु या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पहाटेपासूनच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात ठाण मांडले. असा प्रकार पुन्हा झाला तर पर्यायी स्वरूपात व्यवस्था असणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा रुग्णालयात पर्यायी ऑक्सिजन लाईन टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी जागेची पाहणी करण्यात आली. तसेच जुनी ऑक्सिजन पाईप लाईन आणखी मजबूत करण्याचे काम दिवसभरात करण्यात आले. भविष्यात मूळ ऑक्सिजन लाईनला अडथळा निर्माण झाल्यास पर्यायी स्वरूपात दुसऱ्या ऑक्सिजन लाईनने रुग्णांपर्यंत ऑक्सिजन पुरविण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा शल्यचिकित्सक बाळासाहेब नागरगोजे, उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर आदींसह इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
झाडांच्या फांद्या तोडल्या
जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. वाऱ्यामुळे या झाडांच्या फांद्या तुटून पाईपलाईन फुटण्यासारखे प्रकार होऊ शकतात. ही बाब लक्षात घेऊन या परिसरातील झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम बुधवारी दिवसभरात करण्यात आले. मंगळवारी ऑक्सिजन गळतीच्या घटनेनंतर प्रशासनाने खबरदारी घेतली असून सर्वतोपरी उपाय केले जात आहेत.