सुपेच्या कार्यकाळात आणखी एक कारनामा;शिक्षण सेवकांच्या बनावट नियुक्ती आदेशाचा भांडाफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2022 05:02 PM2022-02-19T17:02:12+5:302022-02-19T17:02:48+5:30

टीईटी परीक्षा घोटाळ्यातील आरोपी तथा तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांच्या कार्यकाळातील अनेक प्रकार समोर येत आहेत.

Another fraud of Tukaram Supe's tenure; exposing fake appointment order of primary teacher | सुपेच्या कार्यकाळात आणखी एक कारनामा;शिक्षण सेवकांच्या बनावट नियुक्ती आदेशाचा भांडाफोड

सुपेच्या कार्यकाळात आणखी एक कारनामा;शिक्षण सेवकांच्या बनावट नियुक्ती आदेशाचा भांडाफोड

Next

- अभिमन्यू कांबळे
परभणी : बनावट आदेशाद्वारे शिक्षण सेवक पदावर नियुक्ती मिळविण्याच्या प्रकरणाचा भांडाफोड झाला असून, याद्वारे रुजू होण्यासाठी आलेली एक महिला गुन्हा दाखल होण्याची कुणकुण लागताच पसार झाली आहे.

टीईटी परीक्षा घोटाळ्यातील आरोपी तथा तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांच्या कार्यकाळातील अनेक प्रकार समोर येत आहेत. त्यामध्ये आता प्राथमिक शिक्षण सेवकांच्या बनावट नियुक्ती आदेशाची भर पडली आहे. ११ ऑक्टोबर २०२१ रोजी सुपे यांच्या नावाने परभणी जि. प.च्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या नावे एक आदेश काढण्यात आला. त्यामध्ये १२ प्राथमिक शिक्षण सेवकांची नावे देऊन त्यांना तात्काळ रुजू करुन घेण्याचे आदेश दिले होते. परीक्षा परिषदेमार्फत प्रत्येक वेळी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावे आदेश येतात. यावेळी थेट शिक्षणाधिकाऱ्यांच्या नावे आदेश आल्याने जि. प. सीईओं शिवानंद टाकसाळे यांना संशय आला. यामुळे त्यांनी या आदेशाची पडताळणी करण्यासाठी दि. १६ नोव्हेंबर रोजी शिक्षणाधिकारी टी. एस. पोले यांना पुणे येथे पाठविले.

पोले यांनी राज्य शिक्षा परिषदेच्या कार्यालयास भेट देऊन या आदेशाची शहानिशा केली असता तो बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या प्रकरणी गुन्हा दाखल करावा, असे पत्र परभणी जि. प.च्या वतीने सुपे यांना देण्यात आले होते. परंतु, सुपे यांनी गुन्हा दाखल केला नाही. त्यानंतर टीईटी परीक्षा घोटाळ्यात सुपे यांना १६ डिसेंबर रोजी अटक झाली. या पार्श्वभूमीवर ज्या बनावट शिक्षण सेवक नियुक्तीच्या आदेशात १२ शिक्षण सेवकांची नावे दिली होती, त्यातील एक महिला शिक्षिका (जि.बीड) १६ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील उखळी (ता.सोनपेठ) येथील जि. प. शाळेवर रुजू होण्यासाठी आली. या महिलेसोबत परभणी जि. प. सीईओंच्या बनावट स्वाक्षरीचा नियुक्ती आदेश होता.

यावेळी उपस्थित मुख्याध्यापकाने या महिलेकडील मूळ कागदपत्रांची तपासणी केली असता आधार व पॅनकार्डवरील नावात तफावत आढळली. त्यामुळे त्यांनी याबाबत सोनपेठ गटशिक्षणाधिकाऱ्यांना कल्पना दिली. सोनपेठ गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांनी असा कोणताही आदेश काढला नसल्याचे सांगितले. ही बाब सीईओ टाकसाळे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर टाकसाळे यांनी याप्रकरणी शिक्षणाधिकारी पोले यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. परंतु, पोलिसांनी मूळ कागदपत्रे मागितल्याने गुन्हा दाखल होऊ शकला नाही. याची कुणकुण लागताच सदरील महिला पसार झाली. आता याप्रकरणी टाकसाळे यांनी पोलीस अधीक्षकांनाच गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पत्र दिले आहे.

Web Title: Another fraud of Tukaram Supe's tenure; exposing fake appointment order of primary teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.