अतिवृष्टीच्या अनुदानाचे आणखी ९० कोटी मिळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:14 AM2021-01-09T04:14:02+5:302021-01-09T04:14:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांच्या नुकसान भरपाईपोटी राज्य शासनाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांच्या नुकसान भरपाईपोटी राज्य शासनाने जिल्ह्याला दुसरा व अंतिम टप्प्यातील ९० कोटी २० लाख रुपयांचा निधी वितरीत केला आहे. हा निधी जिल्ह्यातील १ लाख ८१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात जून ते ऑक्टाेबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे १४ गावांमधील १ लाख ५८ हजार ३८६ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले होते. प्रशासनाकडून या नुकसानाचे पंचनामे करण्यात आले. त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाकडे १०८ कोटी १५ लाख ८४ हजार रुपयांच्या निधीची मागणी प्रशासनाकडून करण्यात आली होती. त्यापैकी ९० कोटी ९२ लाख रुपयांचा निधी राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात दिला होता. आता दुसऱ्या व अंतिम टप्प्यातील ९० कोटी २० लाख ८६ हजार रुपयांचा निधी जिल्ह्याला वितरीत करण्यात आला आहे. त्यामध्ये ६१ कोटी ३५ लाख ५८ हजार रुपयांचा निधी शेतकऱ्यांना एसडीआरएफच्या दराने ६ हजार ८०्० रुपये प्रतिहेक्टर व बहुवार्षिक पिकांसाठी १८ हजार रुपये प्रतिहेक्टर दराने देण्यासाठी वितरीत करण्यात आला आहे. तसेच वाढीव दराने शेती पिकांसाठी ३ हजार २०० रुपये व बहुवार्षिक पिकांसाठी ७ हजार रुपये प्रतिहेक्टरनुसार जिल्ह्याला २८ कोटी ८५ लाख २८ हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. हा मिळालेला ९० कोटी २० लाख ८६ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यातील १ लाख ८१ हजार शेतकऱ्यांना वितरीत करण्यात येणार आहे. या संदर्भातील आदेश दिनांक ७ जानेवारी रोजी राज्याच्या महसूल व वन विभागाने काढले आहेत. हा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून, तो तालुका स्तरावर वितरीत करण्याचे आदेश शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. त्यामुळे आता हा निधी तालुका स्तरावरून थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर काही दिवसात जमा होणार आहे.
३३ टक्के नुकसानग्रस्तांना मदत
अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे किमान ३३ टक्के नुकसान झाले, त्यांनाच ही मदत जाहीर करण्यात आली आहे. या अनुषंगाने कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर १० हजार रुपये तर बागायती शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर २५ हजार रुपये दोन हेक्टर मर्यादेत घोषित करण्यात आले. मात्र, असे असले तरी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना या निकषाप्रमाणे मदत मिळाली नसल्याच्या तक्रारी आहेत.