‘वंचित’च्या तगड्या डावपेचामुळे परभणी जिल्ह्यात महाविकास आघाडीत चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 02:30 PM2024-11-08T14:30:46+5:302024-11-08T14:34:51+5:30

लोकसभेत जमलेली गणिते विधानसभेत बिघडण्याची भीती

Anxiety in MVA over VBA's tactics; Fear of spoiling the calculations of the Lok Sabha in the Assembly | ‘वंचित’च्या तगड्या डावपेचामुळे परभणी जिल्ह्यात महाविकास आघाडीत चिंता

‘वंचित’च्या तगड्या डावपेचामुळे परभणी जिल्ह्यात महाविकास आघाडीत चिंता

- विजय पाटील
परभणी :
जिल्ह्यात यंदा वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीच्या नाकीनऊ आणले आहे. महाआघाडीच्याच माणसांना हाताशी धरून करेक्ट कार्यक्रम करण्याचा प्रकार सुरू असल्याने ही मंडळी सध्या हैराण झाल्याचे चित्र आहे. गंगाखेड व जिंतुरात हे चित्र प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळे लोकसभेला जमलेले आघाडीचे गणित विधानसभेत बिघडण्याची भीती आहे.

लोकसभेला चारपैकी तीन मतदारसंघांत महाविकास आघाडीला मोठे मताधिक्य होते. यावेळी वंचित त्याच्या आड येण्याची भीती आहे. परभणीत ‘वंचित’च्या उमेदवाराचा अर्जच बाद झाल्याचा फायदा महाविकास आघाडीला होताना दिसत आहे. या ठिकाणी उद्धवसेनेचे आ. राहुल पाटील यांच्यासमोर त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी आनंद भरोसे शिंदेसेनेकडून आले आहेत. मात्र, जिंतूरमध्ये ‘वंचित’चा उमेदवार मागच्यावेळीपेक्षा चांगलाच दमदार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची मंडळी चिंतेत पडली आहेत. दिवंगत माजी आ. कुंडलिक नागरे यांचे चिरंजीव सुरेश नागरे हे यावेळी होमग्राउंडवर ‘वंचित’कडून खेळत आहेत. त्यांनी काँग्रेसची यंत्रणाही बऱ्यापैकी सोबत घेतली. त्यामुळे आघाडीला खडतर मार्गावरून प्रवास करावा लागत आहे.

गंगाखेडमध्येही असेच काहीसे चित्र आहे. महाविकास आघाडीची ‘वंचित’कडून आलेल्या माजी आ. सीताराम घनदाट यांच्यामुळे दमछाक होत आहे. लोकसभेला आधीच आघाडीसाठी मायनस गेलेल्या या मतदारसंघात घनदाट यांची चौफेर घुसखोरी सुरू आहे. यात आघाडीच नव्हे, महायुतीचीही दमछाक होत आहे. पाथरीतही ‘वंचित’कडून सुरेश फड हे उमेदवार असले, तरी ते गंगाखेडमधून ऐनवेळी येथे आल्याने किती प्रभावी ठरतील, असा प्रश्न आहे. शिवाय या मतदारसंघात आधीच बहुरंगी लढत आहे. आघाडी व युतीच्या उमेदवाराला आभाळच फाटल्याने ठिगळे कुठे-कुठे लावायची? याचाच मेळ लागत नाही. त्यातही एक भर पडली आहे.

Web Title: Anxiety in MVA over VBA's tactics; Fear of spoiling the calculations of the Lok Sabha in the Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.