मयत प्राध्यापकाची मतदान अधिकारी म्हणून नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:15 AM2020-12-29T04:15:11+5:302020-12-29T04:15:11+5:30

गंगाखेड : ग्रामपंचायत निवडणूक केंद्रावर मतदान अधिकारी म्हणून मयत प्राध्यापकाची नियुक्ती निवडणूक विभागाने करून २६ डिसेंबर रोजी झालेल्या प्रशिक्षण ...

Appointment of deceased professor as polling officer | मयत प्राध्यापकाची मतदान अधिकारी म्हणून नियुक्ती

मयत प्राध्यापकाची मतदान अधिकारी म्हणून नियुक्ती

Next

गंगाखेड : ग्रामपंचायत निवडणूक केंद्रावर मतदान अधिकारी म्हणून मयत प्राध्यापकाची नियुक्ती निवडणूक विभागाने करून २६ डिसेंबर रोजी झालेल्या प्रशिक्षण शिबिरास उपस्थित राहण्याची नोटीसही या प्राध्यापकाच्या नावे काढली आहे. त्यामुळे निवडणूक विभाग प्रशासनाचा अजब कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

गंगाखेड तालुक्यात ७० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात ग्रामंपचायत निवडणुकीचे वातावरण तापले असून, अर्ज भरण्याचे दोन दिवस शिल्लक आहेत. त्याअनुषंगाने निवडणूक विभागही कामाला लागला आहे. ग्रामपंचायत मतदान अधिकारी म्हणून निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार स्वरूप कंकाळ यांच्या स्वाक्षरीने काही प्राध्यापक व शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यानुसार २६ डिसेंबर रोजी शहरातील साई वृंदावन कार्यालयात आयोजित प्रशिक्षण शिबिरास उपस्थित राहण्याची नोटीसही काढण्यात आली. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी स्वरूप कंकाळ यांच्या स्वाक्षरीने मयत प्राध्यापकाच्या नावे नोटीस काढण्यात आली. विशेष म्हणजे मतदान अधिकारी म्हणून निवडणूक प्रशिक्षण शिबिरास अनुपस्थित राहिल्यास कायदेशीर कार्यवाही करण्याचा इशाराही या नोटीसमध्ये देण्यात आला. प्राध्यापक हाश्मी सय्यद रफीक सय्यद तमीज यांचे २१ मार्च २०२० रोजी हृदयविकाराने निधन झाले. ते संत जनाबाई कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. निवडणूक विभागाने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अद्ययावत याद्या शाळेतून मागविल्या नसल्याचे या प्रकारातून समोर येत आहे. १५ जानेवारी रोजी तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. मात्र, निवडणूक विभागाच्या या अजब कारभारामुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

...तर घडला नसता प्रकार

तालुक्यातील शाळांतून निवडणूक विभागाला शिक्षकांच्या याद्या मागविताना मुख्याध्यापक, शिक्षकांचे नाव, पदनाम, बेसिक पगार, जन्मतारीख नेमणूक तारीख आणि सेवानिवृत्तीचा दिनांक अशी परिपूर्ण माहिती दिली जाते. या यादीतील निवृत्ती होणाऱ्या शिक्षकांची नावे न पाहताच निवडणूक कामावर हजर राहण्याची नोटीस या विभागाकडून पाठविली जात आहे. निवडणूक कामासाठी असणारे कर्मचारी पारदर्शकता न ठेवता सरळ तहसीलदारांच्या स्वाक्षरीने नोटीस पाठवत आहेत. शाळेतून आलेल्या प्रत्येक यादीची छाननी करून निवडणूक मतदान अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती केली असती तर हा प्रकार घडला नसता, अशी चर्चा तालुक्यात होत आहे.

Web Title: Appointment of deceased professor as polling officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.