चार उच्च पातळी बंधाऱ्यांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:17 AM2021-09-25T04:17:46+5:302021-09-25T04:17:46+5:30
परभणी : पूर्णा नदीवरील चार उच्च पातळी बंधाऱ्यांना जलसंपदा खात्याने मंजुरी दिली असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ...
परभणी : पूर्णा नदीवरील चार उच्च पातळी बंधाऱ्यांना जलसंपदा खात्याने मंजुरी दिली असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. याप्रश्नी आ. डॉ. राहुल पाटील यांनी पाठपुरावा केला होता, त्यास यश मिळाले आहे.
परभणी तालुक्यातील जोड परळी, पोटा, पिंपळगाव कुटे आणि ममदापूर येथे पूर्णा नदीवर १० दलघमीचे ४ बंधारे जलसंपदा खात्याच्या वतीने निर्माण केले जाणार असून, यासाठी जमीन संपादनासह बंधारे निर्मितीसाठी १ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे आ. डॉ. राहुल पाटील यांनी सांगितले. या बंधाऱ्यांसाठी २०१४ पासून आ. डॉ. राहुल पाटील यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. बंधाऱ्यांमुळे ८ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून, प्रत्येक बंधाऱ्याला २ कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. या बंधाऱ्यांना मंजुरी दिल्याबद्दल २४ सप्टेंबर रोजी आ. डॉ. पाटील यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा सत्कार केला. यावेळी खा.फौजिया खान, शिवसेनेचे तालुकाप्रमुख नंदकुमार आवचार, अरविंद देशमुख, दिलीप ताडकळसकर, गोविंदराव काळे, बाळासाहेब ढोले, संभानाथ काळे, मारोती तिथे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.