सैन्याच्या गाडीचा पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात; वसमत तालुक्यातील जवानाला आले वीरमरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 02:16 PM2024-05-23T14:16:50+5:302024-05-23T14:17:08+5:30
दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात सैन्य दलाचे वाहन आणि कंटेनरचा झाला भीषण अपघात
वसमत (जि. हिंगोली) : तालुक्यातील गुंज येथील जवान अंकुश वाहुळकर यांचा २२ मे रोजी दुपारी १ वाजेदरम्यान पश्चिम बंगालमधील बिनागोडी येथून कठिहाल येथे जात असताना भीषण अपघातात मृत्यू झाला. ही बातमी गुंज येथे कळताच गावावर शोककळा पसरली आहे.
वसमत तालुक्यातील गुंज येथील अंकुश वाहुळकर हे पश्चिम बंगाल येथे कर्तव्य बजावत होते. २२ मे रोजी बिनागोडी येथून कठिहालकडे जाणाऱ्या सैन्य दलाच्या वाहनातून ते कर्तव्य बजाविण्यासाठी जात होते. त्यांच्या सोबत इतर सैनिकही होते. यावेळी गुलाबाह जवळ एका दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात सैन्याचे वाहन आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. यात जवान अंकुश वाहुळकर यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गुंज गावासह वसमत तालुक्यावर शोककळा पसरली आहे. जवान अंकुश वाहुळकर हे डिसेंबर २०२० मध्ये वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी सैन्यात भरती झाले होते. त्यांच्या पश्चात आई, वडिल, दोन भाऊ, एक बहीण असा मोठा परिवार आहे. वीरमरण आलेल्या या जवानावर गुंज येथे २४ मे रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
माझा काळजाचा तुकडा काळाने नेला...
अंकुशला लहानपणापासून देशाबद्दल प्रेम होते. शाळेत असतानाच मी मिल्ट्रीमध्ये जाणार, देशाची सेवा करणार असे म्हणायचा. गुरुजणांनी शाळेत दिलेला गृहपाठ रोजच्या रोज पूर्ण करायचा. गृहपाठ पूर्ण करत मित्रांना म्हणायचा आपण मोठेपणी सैन्यात जावू, देशाची सेवा करु, मला देशाची सेवा करण्याची खूप इच्छा आहे,असे तो म्हणत असे. माझ्या लेकराची सैन्यात जाण्याची इच्छा देवाने पूर्ण केली. परंतु काळाने माझा काळजाचा तुकडा माझ्यापासून कायमचा हिरावून घेतला आहे.
- राणीबाई एकनाथ वाहुळकर (वीर जवान अंकुशची आई)