जनावरांसाठी केले जाताहेत कृत्रिम पाणवठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:02 AM2021-02-05T06:02:42+5:302021-02-05T06:02:42+5:30
ग्रामीण भागात पशुधन व वन्यजीव यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कृत्रिम पाणवठे ही ...
ग्रामीण भागात पशुधन व वन्यजीव यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कृत्रिम पाणवठे ही संकल्पना राबविण्याचे आवाहन केले होते. जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सेलू तालुक्यात गटविकास अधिकारी विष्णू मोरे यांनी ग्रामस्थांनी लोकसहभागातून कृत्रिम पाणवठे बसविण्यासाठी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेची सुरुवात म्हणून विष्णू मोरे व कार्यालय अधीक्षक श्यामसुंदर बोराडे या दोघांनी स्वखर्चाने देवगांवफाटा येथे ३ फेब्रुवारी रोजी घनवन प्रकल्प परिसरात कृत्रिम पाणवठा बसवला आहे. तर गटविकास अधिकारी मोरे व ग्रामसेवक उद्धव नागरे यांनी १ फेब्रुवारी रोजी स्वखर्चाने करजखेडा येथे ३ पाणवठे तयार केले आहेत. यावर्षी पर्जन्यमान चांगले असल्याने जलाशयात चांगला पाणीसाठा आहे,परंतु जास्त आंतर चालण्याऐवजी जनावरांना ठिकठिकाणी पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ग्रामीण भागातील नागरिकांनी पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी लोकसहभागातून पाणवठे बसवून जनावरांप्रती सामाजिक दायित्व दाखवावे, असे आवाहनही गटविकास अधिकारी मोरे यांनी केले आहे.
ग्रामस्थांनी व विशेषतः गावागावातील नोकरी व व्यवसाय करणाऱ्या मंडळींंनी सामाजिक भावनेतून या मोहिमेत सहभागी होऊन लोकसहभागातून आपापल्या गावी कृत्रिम पाणवठे उभारणीसाठी सहकार्य करावे.
विष्णू मोरे, गटविकास अधिकारी पं.स.सेलू