२५ हजारांची लाच घेताना सहायक निबंधक चतुर्भुज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:13 AM2021-06-18T04:13:28+5:302021-06-18T04:13:28+5:30
यासंदर्भात तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारकर्त्याचे भाऊ चेअरमन असलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या विरोधात ...
यासंदर्भात तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारकर्त्याचे भाऊ चेअरमन असलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या विरोधात आलेल्या तक्रारीमध्ये सुनावणीसाठी मदत करणे आणि निकाल त्यांच्या बाजूने देण्यासाठी पूर्णा येथील सहकारी संस्थेचे सहायक निबंधक रवींद्र रमेशराव सावंत यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. या लाचेचा पहिला हप्ता म्हणून २५ हजार रुपये तक्रारदाराकडून स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक भरत हुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी हनुमंते, अनिल कटारे, शेख मुख्तार, माणिक चट्टे आदींनी केली. या प्रकरणी रवींद्र सावंत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्णा पोलीस ठाण्यात सुरू असल्याची माहिती एसीबीच्या वतीने देण्यात आली.