२५ हजारांची लाच घेताना सहायक निबंधक चतुर्भूज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:13 AM2021-06-18T04:13:50+5:302021-06-18T04:13:50+5:30
या संदर्भात तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारकर्त्याचे भाऊ विविध कार्यकारी सेवाभावी संस्थेचे चेअरमन आहेत. या ...
या संदर्भात तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारकर्त्याचे भाऊ विविध कार्यकारी सेवाभावी संस्थेचे चेअरमन आहेत. या सेवाभावी संस्थेविरुद्ध वार्षिक सभा का घेतली नाही, या कारणावरून काहीजणांनी सहायक निबंधकांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर सुनावणी होणार होती. मात्र सुनावणीपूर्वी प्रकरण मिटविण्यासाठी तसेच सुनावणीत मदत करण्यासाठी पूर्णा येथील सहकारी संस्थेचे सहायक निबंधक रवींद्र रमेशराव सावंत यांनी ५० हजार रुपयांची मागणी केली असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झाली होती. या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी दुपारी दोन वाजता पूर्णा येथील सहायक निबंधक यांच्या कार्यालयात सापळा लावला. त्यावेळी मागणी केलेल्या रकमेपैकी पहिला हप्ता म्हणून २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहायक निबंधक रमेश सावंत याला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक भरत हुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी हनुमंते, अनिल कटारे, शेख मुख्तार, माणिक चट्टे, आदींनी केली.
सहायक निबंधकाविरुद्ध गुन्हा
दरम्यान, या प्रकरणात पूर्णा येथील सहायक निबंधक रवींद्र रमेशराव सावंत याच्याविरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक भरत हुंबे तपास करीत आहेत.