परभणीत गस्तीवरील पोलीस कर्मचाऱ्यासह होमगार्डला बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 07:44 PM2019-03-08T19:44:15+5:302019-03-08T19:47:20+5:30

आरोपींनी वायरलेस सेटची तोडफोड करत मारहाण केली

attack on Home guards and police personnel in Parbhani | परभणीत गस्तीवरील पोलीस कर्मचाऱ्यासह होमगार्डला बेदम मारहाण

परभणीत गस्तीवरील पोलीस कर्मचाऱ्यासह होमगार्डला बेदम मारहाण

Next
ठळक मुद्देपोलिसास गाडीमधून खाली ओढून शिवीगाळ करीत मारहाण केली. आरोपीं वायरलेस सेटची तोडफोड करुन पळून गेले.

परभणी : जिंतूर उपविभागातील दरोडा प्रतिबंधक विभागाच्या वाहनातून रात्री ११ वाजेच्या सुमारास पेट्रोलिंग करणाऱ्या एका पोलीस कर्मचारी व होमगार्डला चौघांनी मारहाण केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणी बामणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, जिंतूर उपविभागातील दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंगची एम.एच.२२-डी-टी ८९७ क्रमांकाची गाडी घेऊन चालक तथा पोलीस कर्मचारी मुर्तूजा हुसेन सबदर रिझवी हे होमगार्ड दौंड यांच्या सोबत गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास जिंतूरहून बामणीकडे पेट्रोलिंगसाठी जात होते. त्यांचे वाहन अंगलगावच्या दीड कि.मी. पुढे आले असता रस्त्यावर चौघे उभे असल्याचे दिसून आले. 

यावेळी चालक रिझवी यांनी पोलीस गाडी उभी करुन या चौघांना त्यांचे नाव, गाव विचारले. त्यावेळी त्यांनी अनिल घुगे, रवि घुगे, विठ्ठल सांगळे व बालाजी सांगळे (सर्व रा.अंबरवाडी) असे सांगितले. त्यानंतर रिझवी यांना या चौघांनी आम्हाला नाव-गाव विचाराणा तू कोण? म्हणून गाडीमधून खाली ओढून शिवीगाळ करीत मारहाण केली. यावेळी त्यांच्या सोबतचे होमगार्ड दौंड हे सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली. तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यांच्या तावडीतून सुटून होमगार्ड दौंड हे पळून गेले. 

त्यानंतर रिझवी हे पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देण्यासाठी गाडीमधील वायरलेस सेटकडे जात असताना आरोपींनी या वायरलेस सेटची तोडफोड करुन पळून गेले. त्यानंतर रिझवी यांनी बामणी पोलीस ठाणे गाठून तेथील कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी जखमी रिझवी यांना उपचारासाठी जिंतूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. याबाबत पोलीस कर्मचारी रिझवी यांच्या फिर्यादीवरुन चौघांवर बामणी पोलीस ठाणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: attack on Home guards and police personnel in Parbhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.