शेतशिवारात हिंस्त्र प्राण्यांचा हल्ला; आठ शेळ्यांची शिकार, सात शेळ्या गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2023 06:25 PM2023-04-01T18:25:53+5:302023-04-01T18:26:14+5:30
घटनास्थळी वन व पशू वैद्यकीय विभागाच्या पथकाने केली पाहणी; घटनेमुळे झरी शिवारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
- अनिल जोशी
झरी (जि.परभणी) : शेत आखाड्यावर बांधलेल्या शेळ्यांवर हिंस्त्र प्राण्याने हल्ला केला. ही घटना शनिवारी सकाळी १० च्या सूमारास परभणी तालुक्यातील झरी शिवारालगत घडली. यामध्ये आठ शेळ्या ठार झाल्या तर सात शेळ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. यामुळे पशूपालकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
येथील झरी शिवारात दुधना काठावर गट क्रमांक ६३१ मध्ये संतोष ज्ञानोबा शिंदे यांचा शेत आखाडा आहे. या ठिकाणी त्यांनी जवळपास वीस शेळ्या बांधल्या होत्या. मागील काही दिवसापासून विद्युत पुरवठा तांत्रिक दुरुस्ती अभावी बंद असल्याने शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास संतोष शिंदे हे पाणी व जेवण आणण्यासाठी गावाकडे गेले. ते परत साडेदहा वाजता शेतामध्ये आले असता त्यांना परिसरात आठ शेळ्या ठार तर काही शेळ्या जखमी झाल्याचे दिसले. त्यांनी हा प्रकार ग्रामस्थांना सांगितला. तसेच ही घटना वन विभागाला कळवण्यात आली. यात गोठ्यातील पाच शेळ्या दिसून आल्या नाही. यानंतर वन विभागाचे वनपाल के.एस.भंडारी, एन.एस.शेख आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शेळ्यांचा मृत्यू हा हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्याने झाल्याचे स्पष्ट केले. झरीचे पशुवैद्यकीय अधिकारी अजय धमगुंडे यांनी जखमी शेळ्यांवर उपचार केले.
लांडग्याने हल्ला केल्याचा अंदाज
सदरील शेळ्यांवरील हल्ला हा दोन-तीन लांडग्यांनी केला असावा, असा अंदाज वन विभागाचे वनपाल के.एस.भंडारी यांनी व्यक्त केला. त्यात मयत शेळ्यांच्या गळ्याला चावा घेऊन लचके तोडल्याचे दिसून येत आहे. घटनेमुळे झरी शिवारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.