ऑक्सिजन गॅस पाईपच्या तांब्याची तार चोरण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:26 AM2021-02-23T04:26:05+5:302021-02-23T04:26:05+5:30
परभणी: शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या ऑक्सिजन पाईपची तांब्याची तार चोरण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून याप्रकरणी ...
परभणी: शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या ऑक्सिजन पाईपची तांब्याची तार चोरण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून याप्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात १० दिवसांपूर्वी ऑक्सिजन पाईपची तांब्याची तार चोरण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली होती. आता पुन्हा या प्रकारची घटना घडली आहे. याबाबत औषध निर्माण अधिकारी संजयकुमार इरन्ना लोखंडे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास अतिदक्षता विभागाच्या ऑक्सिजन पाईपमधून ऑक्सिजन लिक होत असल्याची माहिती औषध निर्माण अधिकारी लोखंडे यांना मिळाली. त्यानंतर त्यांने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहिले असता अज्ञात व्यक्तीने चोरीच्या उद्देशाने अतिदक्षता विभागाच्या ऑक्सिजन पाईपची तांब्याची तार वाकवली होती. त्यामधून गॅस लिक होत होता. याबाबत लोखंडे यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून रुग्णालयातील अंदाजे ४ हजार ५०० रुपयांचे नुकसान केल्याचे नमुद करण्यात आले आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.