चोरटे गॅस कटर घेऊन थेट पोहचले एटीएम मशीन फोडण्यास, परभणी येथील घटना
By राजन मगरुळकर | Published: July 11, 2023 06:05 PM2023-07-11T18:05:51+5:302023-07-11T18:11:41+5:30
परभणीच्या औद्योगिक वसाहत परिसरातील घटना
परभणी : शहरातील वसमत महामार्गावरील औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने कापून फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी बँकेच्या वतीने नवा मोंढा ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
शहरातील वसमत राष्ट्रीय महामार्गावर स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा औद्योगिक वसाहतीच्या परिसरात आहे. बँकेच्या समोरील बाजूस ग्राहकांसाठी एटीएम सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे एटीएम अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी पहाटेच्या सुमारास गॅस कटरच्या सहाय्याने कापून फोडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, या घटनेत एटीएममधील रक्कम किंवा अन्य कोणतेही साहित्य चोरीला गेले नाही. घटनेची माहिती सकाळी बँक शाखेच्या अधिकाऱ्यांना समजल्यानंतर तेथे जाऊन पाहणी केल्यावर नवा मोंढा पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यावरून शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे, पोलीस निरीक्षक सुभाष अनमूलवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मुंडे, कवाळे, नांदगावकर, स्थानिक गुन्हा शाखेचे पथक यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी पोलीस पथकाकडून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, बँकेच्या वतीने दुपारच्या सुमारास या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.