पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यास काळे फासण्याचा प्रयत्न; संभाजी ब्रिगेड, मनसे आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 05:29 PM2023-08-17T17:29:35+5:302023-08-17T17:33:22+5:30
परभणी येथील विमा कार्यालयात तोडफोड करत अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न
- सत्यशील धबडगे
मानवत: पिक नुकसानीचे पंचनामा झाले नसल्याने संतप्त संभाजी ब्रिगेड व मनसे कार्यकर्त्यांनी परभणी येथील विमा कंपनीच्या कार्यालयाची आज दुपारी तोडफोड केली. तसेच कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न केल्याने एकच गोंधळ झाला.
मानवत तालुक्यात 21 दिवसापासून पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे जी पिके उगवली आहेत, ती देखील पाण्याअभावी करपून जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. परिणामी शेतकरी चांगलाच धास्तावला असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतातील पिकांचे पंचनामे करण्याची मागणी संभाजी ब्रिगेड व मनसे कार्यकर्त्यांनी आयसीआयसीआय लोमार्ड विमा कंपनी व जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली होती. तसेच १० ऑगस्ट रोजी मागणी पूर्ण करण्यासाठी 17 ऑगस्टपर्यंतचा अल्टीमेटम दिला होता.
दरम्यान, आजपर्यंत पंचनामा करण्यात आले नसल्याने संतप्त संभाजी ब्रिगेड व मनसेचे कार्यकर्ते परभणी येथील पिकविमा कंपनीच्या कार्यालयात धडकले. संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष गोविंद घांडगे, मनसे तालुका अध्यक्ष माऊली दहे मनसेचे दत्तराव शिंदे,अर्जुन टाक, महादेव काकडे, , बालाजी पौळ, हनुमान मस्के, शहराध्यक्ष संतोष कुन्हाडे केशव काकडे, गणेश लाडाणे, आदित्य आवचार, शिवाजी लाडाणे, लक्ष्मण शिंदे आदींनी कंपनीचे अधिकारी बेदरेकर यांना दिरंगाईचा जाब विचारला. मात्र त्यांना समाधानकारक उत्तर देता न आल्याने कार्यकत्यांनी संताप व्यक्त करत कार्यालयातील फर्निचरची मोडतोड केली. तसेच अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा प्रयत्न केला.