जिल्हा बँकेसाठी सरासरी ९९ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:16 AM2021-03-22T04:16:16+5:302021-03-22T04:16:16+5:30

परभणी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १४ जागांसाठी २१ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ९९ टक्के मतदान झाले. ...

Average 99% turnout for District Bank | जिल्हा बँकेसाठी सरासरी ९९ टक्के मतदान

जिल्हा बँकेसाठी सरासरी ९९ टक्के मतदान

Next

परभणी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १४ जागांसाठी २१ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ९९ टक्के मतदान झाले. सायंकाळी ४ वाजेपर्यंत १५७३ मतदारांपैकी १५५३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सोनपेठ येथे दोन गटांत झालेला वादाचा प्रकार वगळता इतर ठिकाणी शांततेत मतदान पार पडले.

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ जागांसाठी निवडणूक घेतली जात आहे. या निवडणुकीत ७ संचालक यापूर्वीच बिनविरोध निवडले असल्याने रविवारी १४ जागांसाठी मतदान घेण्यात आले. एकूण ३० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांतील राजकीय मंडळींनी बँकेची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. रविवारी सकाळी ८ वाजेपासून मतदानाला प्रारंभ झाला. एकूण १ हजार ५७३ मतदार असून, परभणी जिल्ह्यातील ९ आणि हिंगोली जिल्ह्यातील ५, अशा १४ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविण्यात आली.

सकाळी ८ वाजेपासून मतदानाला प्रारंभ झाला. कमी मतदारसंख्या असल्याने सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. दुपारी १२ वाजेपर्यंत १ हजार १५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. पहिल्या चार तासांत ६४.५१ टक्के मतदान पार पडले. दुपारी २ वाजेपर्यंत १ हजार ४३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, ९१ टक्के मतदान या काळात झाले, तर सायंकाळी ४ वाजेपर्यंत १ हजार ५७३ पैकी १ हजार ५२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ९७.१४ टक्के मतदान ४ वाजेपर्यंतच पूर्ण झाले होते. सायंकाळी ५ वाजेपर्यंत १ हजार ५७३ पैकी १ हजार ५५३ मतदारांनी मतदान केले. सहकार क्षेत्रातील महत्त्वपूर्ण बँक म्हणून जिल्हा बँकेकडे पाहिले जाते. ग्रामीण भागातील आर्थिक नाडी असेही या बँकेची ओळख आहे. त्यामुळे या बँकेची निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.

कल्याण मंडपम्‌ येथे मतमोजणी

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २३ मार्च रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणी होणार आहे. शहरातील जायकवाडी परिसरातील कल्याण मंडपम्‌ येथे मतमोजणीसाठी ८ टेबलची व्यवस्था करण्यात आली असून, ५४ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सुरुवातीला प्रत्येक टेबलवर प्राथमिक कृषी पतपुरवठा विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघाची तालुकानिहाय मतमोजणी होणार असून, त्यानंतर पुढील मतदारसंघातील मतमोजणी केली जाणार आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

असे झाले मतदान

परभणी ९९.६३

जिंतूर ९८.५७

सेलू १००

पाथरी ९८.१५

मानवत ९८.८१

सोनपेठ ९८.११

गंगाखेड ९९.२५

पालम ९८.०६

पूर्णा १००

हिंगोली ९७.७३

सेनगाव ९२.१६

औंढा १००

वसमत १००

कळमनुरी १००

एकूण ९८.७३

सोनपेठमध्ये दोन गटांत वाद

सोनपेठ : जिल्हा बँकेच्या निवडणुकीदरम्यान सोनपेठ येथील मतदान केंद्रावर सकाळी १० वाजेच्या सुमारास दोन गटांत वाद झाला. या वादामध्ये दोन गाड्यांचेही नुकसान झाले आहे. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सकाळी मतदानाला प्रारंभ झाला. सकाळी १० वाजेच्या सुमारास जि.प.चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर आणि गंगाधर बोर्डीकर यांच्या समर्थकांमध्ये वाद झाला. याच वादातून झालेल्या दगडफेकीत दोन गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत. पोलिसांनी वेळीच आक्रमक पवित्रा घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. या प्रकारानंतर मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. त्यामुळे मतदान केंद्रावरील वातावरण तणावपूर्ण झाले होते.

Web Title: Average 99% turnout for District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.