पुरस्कारप्राप्त शेतकरी आता होणार लखपती; ७५ हजारांवरून थेट ३ लाख रुपये मिळणार
By हरी मोकाशे | Published: February 9, 2024 06:42 PM2024-02-09T18:42:09+5:302024-02-09T18:42:48+5:30
राज्यात दरवर्षी शेती व शेतीपूरक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास अथवा संस्थेत कृषी विभागामार्फत विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते.
- मारोती जुमडे
परभणी : शेती व शेतीपूरक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास अथवा संस्थेत कृषी विभागामार्फत सन्मानित करण्यात येते. परंतु, या पुरस्कारानिमित्त देण्यात येणारी रक्कम ही तूटपुंजी होती. मात्र, आता ७ फेब्रुवारी रोजी कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास विभागाने यामध्ये थेट तीन पटीने वाढ केली आहे. त्यामुळे आता पुरस्कार मिळणारा शेतकरी थेट लखपती होणार आहे.
शेती क्षेत्रामध्ये दरवर्षी होणाऱ्या अमुलाग्र बदलामध्ये ज्या शेतकऱ्यांचा मोठा वाटा असतो. त्यांना प्रोत्साहन मिळावे, या हेतूने राज्यात दरवर्षी शेती व शेतीपूरक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास अथवा संस्थेत कृषी विभागामार्फत विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण सेंद्रिय शेती, वसंतराव नाईक शेतीमित्र, युवा शेतकरी, उद्यानपंडित पुरस्कारांचा समावेश राज्य शासनाच्या वतीने करण्यात आला आहे. मात्र, या पुरस्कारांची मिळणारी रक्कम ही पुरस्कार स्वीकारण्यास जाणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांना परवडणारी नव्हती.
त्यामुळे कुठेतरी या पुरस्काराच्या रकमेमध्ये वाढ व्हावी, यासाठी मागील काही वर्षांपासून मागणी सुरू होती. परंतु, आता ही मागणी राज्य शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या वतीने पूर्ण करण्यात आली आहे. यापुढे आता शेती व शेतीपूरक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास राज्य शासनाकडून कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये तीन ते चार पट वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुरस्कार मिळालेला शेतकरी आता थेट कृषी विभागाच्या मदतीने लखपती होणार आहे. याबाबतचा शासन निर्णय राज्य शासनाने ७ फेब्रुवारी रोजी काढला आहे.
७५ हजारांवरून थेट ३ लाख मिळणार
कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये अकरा बाबींचा समावेश करण्यात येतो. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार हा राज्यातून एकाला देण्यात येतो. यामध्ये आतापर्यंत पुरस्कार विजेत्याला ७५ हजार रुपयांची रक्कम देण्यात येत होती. परंतु, नव्या शासन निर्णयानुसार संबंधित प्रगतशील शेतकऱ्याला तीन लाख रुपये मिळणार आहेत. त्यामुळे पुरस्कारप्राप्त शेतकरी थेट लखपती होणार आहे.
दरवर्षी १०३ शेतकऱ्यांना दिला जातो पुरस्कार
शेतकऱ्यांचे केवळ उत्पादन व उत्पादकता वाढविणे, हे ध्येय यापुढे न राहता उत्पादित होणाऱ्या शेतमालाची दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे. शेतीशी निगडित घटकांबाबत जगात वेगवेगळे होत असलेले बदल, विकसित होत असलेले तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या गरजेनुरूप योग्यवेळी पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक साह्य व सोयी सुविधा पुरविणे गरजेचे आहे. या सर्व बाबी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी कृषी विभागाच्या वतीने ११ घटकांतर्गत वर्षभरात जवळपास १०३ शेतकऱ्यांना पुरस्कार दिला जातो. यामध्ये सर्वाधिक वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार म्हणून ३४ जणांना दिला जातो, तर त्यानंतर युवा शेतकरी पुरस्कारासह इतर शेतकऱ्यांनाही या पुरस्काराचे वितरण केले जाते. यामध्ये आता शेतकऱ्यांना तीन लाखापासून ते एक लाख रुपयांपर्यंत पुरस्काराची रक्कम मिळणार आहे.