आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि युनानी डॉक्टर देतात अॅलियोपॅथीची औषधी ; जिंतूर ग्रामीण रुग्णालयातील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 05:31 PM2018-05-29T17:31:16+5:302018-05-29T17:31:16+5:30
येथील ग्रामीण रुग्णालयात चक्क आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि युनानी डॉक्टरांकडून बाह्य रुग्णांची नियमित तपासणी करून त्यांना अॅलियोपॅथीच्या औषधी दिली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.
- विजय चोरडिया
जिंतूर ( परभणी ) : येथील ग्रामीण रुग्णालयात चक्क आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि युनानी डॉक्टरांकडून बाह्य रुग्णांची नियमित तपासणी करून त्यांना अॅलियोपॅथीच्या औषधी दिली जात असल्याचा प्रकार समोर आला असून रुग्णांच्या जिवाशी खेळल्या जाणाऱ्या या प्रकाराबाबत रुग्णालय प्रशासन मात्र काडीमात्र गंभीर नाही.
जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दररोज ३०० ते ४०० रुग्ण उपचारासाठी येतात. या रुग्णालयास ट्रॉमाकेअरही जोडलेली आहे. रुग्णांना चांगली सेवा मिळावी, यासाठी येथे तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रमुख राज्य मार्गावरील या रुग्णालयात उपचारासाठी मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे या रुग्णालयातून रुग्णांना दर्जेदार सेवा मिळणे आवश्यक असताना गेल्या काही दिवसांपासून येथील व्यवस्थापन कोलमडल्याने रुग्ण सेवेचा बोजवारा उडाला आहे.
रुग्णालयात अॅलोपॅथीचे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असल्याने त्यांच्याकडूनच दैनंदिन रुग्णांची तपासणे गरजेचे असताना आयुर्वेदिक व होमिओपॅथिक आणि युनानी डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी केली जात आहे. व याच तीन विभागाच्या डॉक्टरांकडून अधिकार नसताना अॅलियोपॅथीची औषधी लिहून दिली जात आहे. विशेष म्हणजे या तिन्ही विभागातील डॉक्टर हे कंत्राटी पद्धतीवर नियुक्तीला आहेत. हद्द म्हणजे शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडूनही अनेकदा नियमित रुग्णांची तपासणी (ओपीडी) केली जात आहे.
हा प्रकार बिनबोभाटपणे अनेक दिवसांपासून सुरू आहे. याशिवाय येथील नेत्र तपासणीसाठी असलेले नेत्र सहाय्यकेही सोयीनुसार सेवा देतात. रुग्णांनी विचारपूस केल्यास आपणाकडे इतर ठिकाणचा पदभार असल्याने वेळ देता येत नाही, अशी उत्तरे त्यांच्याकडून दिली जातात. त्यामुळे नाइलाजाने अनेक रुग्णांना खाजगी सेवाच घ्यावी लागत आहे.
ट्रॉमाकेअरचे ग्रामीण रुग्णालयावर अतिक्रमण
जिंतूर येथे ट्रॉमाकेअर व ग्रामीण रुग्णालय या स्वतंत्र यंत्रणा आहेत; परंतु, अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे ग्रामीण रुग्णालयातील अनेक तज्ज्ञ डॉक्टर ट्रॉमाकेअरमध्ये सेवा देतात. येथे रुग्ण संख्या कमी असते व सोयीनुसार सेवा देता येते. ट्रॉमाकेअरमध्ये निश्चित डॉक्टरांची नियुक्ती असतानाही ग्रामीण रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांना ट्रॉमा केअरमध्ये ड्युटी दिली जाते. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण तपासणीवर परिणाम होत आहे.
अधिकारी कर्मचाऱ्यांचीही मनमानी
या रुग्णालयात एकीकडे अपुरा कर्मचारी वर्ग असताना येथील लिपिक गिरीश देशमुख सहा महिन्यांपासून गैरहजर आहेत. तर दुसरे लिपिक शेख हे १० महिन्यांपासून वरिष्ठांची मर्जी सांभाळून परभणी येथे संलग्न झाले आहेत. या शिवाय डॉ. सोळंके यांनी जिंतूर येथील पदभार घेतला; परंतु, चार महिन्यांपासून ते गैरहजर आहेत. या सर्व प्रकारावर वरिष्ठांकडून कारवाई होण्याऐवजी त्यांना पाठीशी घातले जात आहे.
आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊ
ग्रामीण रुग्णालयाच्या अडचणी संदर्भात आपण आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन अडचणी सोडविण्यासंदर्भात प्रयत्न करू .
- आ. विजय भांबळे , जिंतूर
गरजेनुसार काम करावे लागते
नियमित रुग्णांची तपासणी करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांऐेवजी युनानी, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक डॉक्टरांचा वापर सर्वत्र होतो. यात विशेष काही नाही. यांना ओलिओपॅथीची औषधी देता येत नाहीत. मात्र गरजेनुसार काम चालवावे लागते.
-डॉ. रविकिरण चांडगे, वैद्यकीय अधीक्षक
नियमाबाह्य आहे
डॉक्टरांनी ज्या पॅथीचे शिक्षण घेतले, त्याच पॅथीची प्रॅक्टीस केली पाहिजे. कारण, त्या पॅथीचे त्यांना संपूर्ण ज्ञान असते. मात्र शिक्षण एका पॅथीचे आणि उपचार दुसऱ्या पॅथीतून दिले जात असतील तर ते नियमबाह्यच ठरते. आमचा सुरुवातीपासूनच क्रॉस पॅथी उपचार पद्धतीला विरोध आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये जर असा प्रकार होत असेल तर तो नियमाबाह्यच आहे.
-डॉ.राजू सुरवसे, अध्यक्ष, आय.एम.ए.