बाबाजानी दुर्राणींचा विधानपरिषदेचा संपतोय कार्यकाळ; राजेश विटेकरांच्या नावाची चर्चा !
By ज्ञानेश्वर भाले | Published: June 20, 2024 04:39 PM2024-06-20T16:39:01+5:302024-06-20T16:41:57+5:30
विधान परिषदेची बदलती राजकीय समीकरणे
परभणी : विधान परिषदेत रिक्त होणाऱ्या ११ जागांसाठी निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. यात परभणीतील आमदार बाबाजानी दुर्राणी यांचाही कार्यकाळ संपत असल्याने आता कोणाची वर्णी लागणार यावर तर्कविर्तक लावण्यात येत आहे. बदलत्या राजकीय घडामोडीनुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. बाबाजानी दुर्राणी यांच्या जागेवर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता असून पक्ष पातळीवर त्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. लोकसभेतील रिंगणातून पक्षाने सांगितल्यानुसार घेतलेली माघार आणि आजपर्यंतच्या कामगिरीच्या बळावर विटेकरांना आमदारकीची लॉटरी लागू शकते, अशी चर्चा सध्या रंगत आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फोडाफाडीच्या राजकारणानंतर होत असलेल्या या विधान परिषदेवरील ११ आमदारांची निवड प्रक्रिया अत्यंत वेगळ्या वळणावर आली आहे. यात विधान परिषदेवरील परभणीतील आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा समावेश असून त्यांचा कार्यकाळ २७ जूनला संपत आहे. सलग दोन वेळा विधानपरिषदेवर आमदार झाल्यानंतर तिसऱ्यांदा त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांकडून वर्णी लागण्याच्या आशा जवळपास मावळल्याची स्थिती आहेत. त्यामुळे त्यांनी गत काही दिवसांपासून विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आपली रणनीती आखली असून त्या दृष्टीने प्रयत्न करत आहे.
लोकसभा निवडणुकीत परभणीची जागा महायुतीने अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली होती. मात्र तडजोडीच्या राजकारणात राष्ट्रवादीने ही जागा रासपाला सोडल्याने ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणातून विटेकरांना माघार घ्यावी लागली होती. पक्षाने घेतलेल्या निर्णयात विटेकरांनी आपली सहमती दर्शवल्याने निश्चितच आगामी काळात त्यांना आमदार करू असे, आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परभणीतील सभेत त्यांना दिले होते. त्यामुळे अजित पवारांचे संबंधित आश्वासन विधान परिषदेच्या निवडणुकीतून खरे ठरणार असल्याची स्थिती आहेत. त्यामुळे बाबाजानी दुर्राणी यांचा विधान परिषदेवरील आमदारकीचा कार्यकाळ संपत असल्याने या माध्यमातून विटेकरांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
विधानसभेच्या दृष्टीने तयारी
गत बारा वर्षांपासून मी राष्ट्रवादीच्या माध्यमातून विधान परिषदेवर आमदार म्हणून कार्यरत आहे. पक्षाकडून मला आतापर्यंत महत्त्वपूर्ण पदे आणि प्रतिष्ठा मिळाली. त्यामुळे मी आता विधान परिषद नव्हे तर विधानसभेच्या दृष्टीने तयारी करत असून पाथरी मतदारसंघातून लढणार आहे.
- बाबाजानी दुर्राणी, विधान परिषदेवरील आमदार
आश्वासनाची पूर्तता होईल
आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ध्येय धोरणानुसार कामे केली. लोकसभेच्या निवडणुकीत पूर्ण तयारी असतानासुद्धा ऐनवेळी पक्षाने सांगितल्यानंतर माघार घेतली. त्यामुळे निश्चितच आजपर्यंतच्या कामासह मला मिळालेल्या आश्वासनाची पूर्तता आगामी काळात हाेईल.
- राजेश विटेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष