वादळीवाऱ्यासह गारपिटीने बळीराजा गारद; सलग दुसऱ्या दिवशी परभणीला तडाखा

By मारोती जुंबडे | Published: March 18, 2023 06:52 PM2023-03-18T18:52:06+5:302023-03-18T18:54:04+5:30

जिल्हाधिकाऱ्यांकडून पंचनाम्याचे आदेश

Baliraja Garad with hailstorm; Tadakha for the second day in a row | वादळीवाऱ्यासह गारपिटीने बळीराजा गारद; सलग दुसऱ्या दिवशी परभणीला तडाखा

वादळीवाऱ्यासह गारपिटीने बळीराजा गारद; सलग दुसऱ्या दिवशी परभणीला तडाखा

googlenewsNext

परभणी : सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील ९१ गावांमध्ये वादळीवाऱ्यासह गारपीट झाल्याने रब्बी हंगामातील ज्वारी, गहू या पिकाला मोठा फटका बसला. तर जिंतूर तालुक्यातील चितरणेरवाडी ते आडगाव बाजारदरम्यानच्या ओढ्याला पूर आल्याने दोन्ही गावांतील संपर्क शुक्रवारी तुटला होता.                           

जिल्ह्यात शेतकरी रबी हंगामातील गहू, हरभरा आणि ज्वारी काढण्याच्या लगबगीत असतानाच गारपिटीसह मेघगर्जना व वादळीवाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता ग्रामीण कृषी मौसम सेवेकडून वर्तविण्यात आली होती. त्यानुसार शुक्रवारी पाऊस होऊन ३० हजार हेक्टरवर नुकसान झाले तर सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी गारपिटीसह पाऊस झाला.

यामध्ये प्रामुख्याने ज्वारी काळी पडली असून गहू, हरभरा आदी पिकांचे नुकसान झाले. विशेषतः बहुतांश गावात दोन दिवस गारपीट झाली. पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. त्यांना कडबा, कुटाळ, ज्वारीचे कणसे, गहू, हरभऱ्याच्या सुड्यांचे संरक्षण पावसापासून करावे लागले. सर्वाधिक सोनपेठ तालुक्यातील १८, परभणी १०, पालम तालुक्यातील १५, पूर्णा तीन, सेलू १५, गंगाखेड सात, मानवत आठ अशा एकूण ९१ गावांमध्ये वादळीवाऱ्यासह पाऊस झाला. यामध्ये गंगाखेड तालुक्यातील खंडाळी, परभणी तालुक्यातील आर्वी, सेलू तालुक्यातील कुपटा, पूर्णा तालुक्यातील आवई, सुहागन, बरबडी शिवारात अक्षरश: गारांचा खच साचला होता. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकारी आंचल गोयल, खासदार संजय जाधव, त्या त्या तालुक्यातील तहसीलदारांनी बांधावर जाऊन शनिवारी नुकसानीचा आढावा घेतला.

Web Title: Baliraja Garad with hailstorm; Tadakha for the second day in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.