भिज पावसाने सुखावला बळीराजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:13 AM2021-06-18T04:13:39+5:302021-06-18T04:13:39+5:30
परभणी : जिल्ह्यात यावर्षी चांगला पाऊस होत असून, गुरुवारी भिज पावसाने हजेरी लावली. दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी झाल्याने शेतकरी ...
परभणी : जिल्ह्यात यावर्षी चांगला पाऊस होत असून, गुरुवारी भिज पावसाने हजेरी लावली. दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी झाल्याने शेतकरी सुखावला आहे.
यावर्षी जिल्ह्यात शेतीपूरक पाऊस होत आहे. मान्सूनपूर्व पावसाने धडाक्यात हजेरी लावली. त्यानंतर मान्सूनचा पाऊसही होत आहे. आतापर्यंत अनेक भागांमध्ये पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकरी पेरणीच्या कामांमध्ये गुंतले आहेत.
गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. अधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस होत असल्याने नागरिकांची मात्र तारांबळ उडाली. जिल्ह्यात सर्वदूर या पावसाने हजेरी लावली आहे.
आतापर्यंत सर्वच भागात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकरी आता पेरणीच्या तयारीला लागले आहेत. काही भागात यापूर्वीच कापसाची लागवड झाली होती. आता सोयाबीन पेरणी केली जात आहे. गुरुवारी झालेला पाऊस शेतीसाठी पूरक ठरला आहे. या पावसाने जमिनीत खोलवर पाणी मुरण्यास मदत होणार असल्याने शेतकरी सुखावले आहेत. दरम्यान, यावर्षी जून महिन्यातच पेरण्यांना प्रारंभ झाला. शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन या दोन प्रमुख पिकांच्या पेरणीवर भर दिला आहे.
जिल्ह्यात बुधवारी रात्रीदेखील जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. पूर्णा, परभणी आणि सोनपेठ या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी १३.१ मिमी पाऊस झाला आहे. परभणी तालुक्यात २४.२, गंगाखेड १७.२, पाथरी ११, पूर्णा १७.९, पालम ११.७ आणि सोनपेठ तालुक्यात १८.८ मिमी पाऊस झाला आहे. दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.
चुकीच्या नोंदीमुळे संताप
बुधवारी रात्री जिल्हाभरात पावसाने हजेरी लावली. या पावसाची नोंद प्रशासनाने घेतली आहे; परंतु ही नोंद घेताना परभणी तालुक्यातील सिंगणापूर मंडळात चुकीच्या पद्धतीने नोंद घेण्यात आली. या मंडळांमध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प असताना प्रशासनाने मात्र सिंगणापूर मंडळात १२८.३ मिमी पावसाची नोंद घेतली आहे. सिंगणापूर मंडळांमध्ये बुधवारी रात्री पावसाने हजेरी लावली; परंतु हा पाऊस अत्यल्प स्वरूपाचा होता. प्रशासनाने घेतलेल्या नोंदीनुसार सिंगणापूर मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे; परंतु या मंडळात अतिवृष्टीसारखा पाऊस झाला नाही. या गोंधळामुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सोनपेठ तालुक्यातील ७ गावांचा संपर्क तुटला
सोनपेठ तालुक्यात बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे शेळगाव ते उक्कडगाव या रस्त्यावरील नाल्यावर पाणी आल्याने गोदावरी नदी काठावरील सात गावांचा संपर्क गुरुवारी सकाळी काही वेळासाठी तुटला होता. बुधवारच्या पावसामुळे शेळगाव ते उक्कडगाव रस्त्यावरील नाल्याला पाणी आले. त्यामुळे या रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत होते. परिणामी काही काळासाठी हा मार्ग बंद राहिला. त्यामुळे उक्कडगाव, गंगापिंपरी, गोळेगाव, पिंपळगाव आदी ७ गावांचा संपर्क तुटला होता. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पाणी ओसरल्यानंतर या मार्गावरून वाहतूक पूर्ववत झाली. विशेष म्हणजे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या सातही गावांनी रस्त्याच्या प्रश्नासाठी मतदानावर बहिष्कार टाकला होता; परंतु अद्यापपर्यंत हा प्रश्न सुटलेला नाही.