सेलूतील केळीची आखाती देशात गोडी; शेतकरी, व्यापाऱ्यांना अच्छे दिन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 19:49 IST2024-08-03T19:49:06+5:302024-08-03T19:49:47+5:30
परभणी जिल्ह्यातील सेलू बनले निर्यात केंद्र

सेलूतील केळीची आखाती देशात गोडी; शेतकरी, व्यापाऱ्यांना अच्छे दिन!
- मोहन बोराडे
सेलू (जि. परभणी) : आरोग्याच्या दृष्टिकोनातून केळीला सर्वच जण प्राधान्य देतात. त्यामुळे केळीची जून ते फेब्रुवारी या हंगामात मोठ्या प्रमाणावर मागणी असते. मुबलक पाणी उपलब्ध असणारे शेतकरी केळी बागेकडे वळले असून, सेलू परिसरातील केळी देशभरासह आखाती देशात निर्यात होत आहे.
तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राजवळ आणि शहराच्या काही अंतरावर लागून असलेल्या सातोना, सालगाव, उस्मानपूर या परिसरात निम्न दुधना प्रकल्पाचे बॅक वॉटर पसरलेले आहे. त्यामुळे मुबलक पाणी उपलब्ध असल्याने या परिसरातील बागायतदार शेतकरी केळी बागेकडे वळले, तसेच तालुक्यातील आडगाव, कुपटा, तांदुळवाडी, गुळखंड, कान्हड, हट्टा, हादगाव परिसरातील शेतकरी केळीचे पीक घेत आहेत. तालुक्यातील शिंदे टाकळी येथील शेतकरी इंदरराव पवार यांनी एक एकर १० गुंठे क्षेत्रावर जवळपास १७०० केळी रोपांची लागवडी केली. उपलब्ध पाण्याचे ठिबकद्वारे योग्य नियोजन करून वेळेवर खताचा वापर केला.
केळी रोपे लागवड केल्यानंतर ८ महिन्यांत कमळ बाहेर पडते. त्यानंतर तीन ते चार महिन्यांत फळ परिपक्व होते. जवळपास बारा ते तेरा महिन्यांनी केळीचे पीक हाती येते. पवार यांना केळी लागवडीसाठी एक ते दीड लाख रुपयाचा खर्च लागला. त्यांनी आपला केळीचा बाग ठोक व्यापाऱ्यांना साडेतीन लाख रुपयांना विकला, तसेच त्याचे बेणेदेखील विकून केळी पिकातून निव्वळ दोन लाखांहून अधिक नफा मिळवल्याचे शेतकरी पवार यांनी सांगितले. दरम्यान, पारंपरिक शेती मालाला योग्य भाव मिळत नाही. सद्य:स्थितीत मिळत असलेल्या भावामुळे लागवड खर्चदेखील निघत नाही. त्यामुळे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असलेले शेतकरी योग्य नियोजन करून वेळेवर खत व निगराणी करून केळी उत्पादनातून चांगला नफा मिळवत आहेत.
शेतकरी व व्यापाऱ्यांना फायदा
सेलू तालुक्यासह परिसरात बागायतदार शेतकरी केळीचे उत्पादन घेत आहेत. केळीचा बागेतील केळी ठोक पद्धतीने खरेदी केली जाते. येथील केळीला देशभरासह आखाती देशात मागणी वाढली आहे. त्यामुळे शहरातून दररोज सोलापूर येथे वीस टन माल ट्रकद्वारे पाठवला जातो. तेथून देशातील विविध महानगरांत व इराण, इराक, मलेशिया व दुबई आदी देशांत केळी निर्यात होत आहे. शहरातून १३ किलो बाॅक्सची व्यवस्थित पॅकींग करून माल परदेशात निर्यात केला जात आहे. सद्य:स्थितीत चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांसह विक्रेत्यांना दोन पैसे मिळत आहेत. केळीसाठी मनुष्यबळ लागते. त्यामुळे शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध होत आहे.
- रईस बागवान, ठोक विक्रेते, सेलू.