शासकीय कामात अडथला निर्माण केल्याप्रकरणी खासदार बंडू जाधव यांना अटक व सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2017 07:32 PM2017-12-09T19:32:34+5:302017-12-09T19:33:17+5:30
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर महावितरण कार्यालयास कुलूप ठोकून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी शिवसेनेचे खा. बंडू जाधव यांच्यासह १५ जणांना आज दुपारी २ वाजता पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.
परभणी : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर महावितरण कार्यालयास कुलूप ठोकून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी शिवसेनेचे खा. बंडू जाधव यांच्यासह १५ जणांना आज दुपारी २ वाजता पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.
शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा करण्यात यावा, प्रलंबित असलेल्या कृषी पंपाच्या ३ हजार वीज जोडण्या देण्यात याव्यात, बिघडलेले विद्युत रोहित्र २४ तासात दुरुस्त करुन द्यावे, थकबाकीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येऊ नये यासह अन्य विविध मागण्यांसाठी शिवसेनेचे खा. बंडू जाधव यांनी गुरुवारी परभणीतीलमहावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयास कुलूप ठोकले होते. तब्बल चार तास चाललेले हे आंदोलन अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले होते.
या प्रकरणात महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रमोद कापसे यांच्या फिर्यादीवरुन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी खा.जाधव यांच्यासह ७०० ते ८०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात गुरुवारी युवासेनेचे जिल्हाप्रमुख अर्जून सामाले यांच्यासह चार जणांना अटक केली होती. त्यानंतर शुक्रवारी संदीप भंडारी, रवि कांबळे, सचिन पवार यांना अटक करण्यात आली. शनिवारी खा. बंडू जाधव यांच्यासह जि.प.सदस्य विष्णू मांडे, बोरी बाजार समितीचे प्रशासक प्रभाकर रोहीणकर, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सखुबाई लटपटे, रामप्रसाद रणेर, गजानन गायकवाड, नितेश देशमुख, शेख हाजी शेख मो.हुसेन, विवेक कलमे, मधुकर निरपणे, सुशिला निसरगण, संतोष मुरकुटे, पंढरीनाथ घुले, संजय सारणीकर, माणिक पोंढे यांना दुपारी २ वाजता पोलिसांनी अटक केली.
त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन त्यांना परभणी येथील न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने ७ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला. तसेच महिन्यातून दोन वेळा कोतवाली पोलीस ठाण्यात हजेरी लावणे व या प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत महावितरण कार्यालयात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. यावेळी न्यायालयात अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपाधीक्षक संजय परदेसी, पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यासह पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.