बँकेचे शटर उघडले, कॅमेरे तोडले; सुदैवाने तिजोरीच न फुटल्याने लाखो रुपये वाचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 01:31 PM2020-09-04T13:31:56+5:302020-09-04T13:34:40+5:30
परभणी जिल्हा बॅकेच्या शहर शाखेतील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न फसला
सेलू ( परभणी ) : सेलू - पाथरी रस्त्यावरील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या शहर शाखेत दरोड्याचा प्रयत्न फसल्याचे शुकवारी सकाळी उघडकीस आले. गुरूवारी मध्यरात्री चोरट्यांनी बँकेचे शटर वाकून आत प्रवेश केला. सुदैवाने मजबूत तिजोरी त्यांना फोडता आली नाही. यामुळे त्यातील २ लाख ८० हजार ४१९ एवढी रक्कम सुरक्षित राहिली आहे.
बाजारसमितीच्या यार्डात परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची शहर शाखा आहे. गुरूवारी मध्यरात्री रात्री चोरट्यांनी बँकेचे शटर वाकून आतमध्ये प्रवेश केला. तिजोरी असलेल्या खोलीत जाऊन कटरच्या सहाय्याने तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तिजोरी मजबूत असल्याने चोरट्याने ती फोडण्यात अपयश आले. यामुळे त्यातील २ लाख ८० हजार ४१९ एवढी रक्कम सुरक्षित राहिली. चोरट्यांनी शाखेतील चार सीसीटीव्ही कॅमेरे तोडून त्यातील एक कॅमेरा आणि संगणकाची हार्ड डिस्क लांबवली आहे.
शुक्रवारी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर आलेल्या काही नागरिकांना बॅकेचे शटर वाकलेले दिसले. त्यांनी ही माहिती मुख्य शाखेचे शाखाधिकारी एस. जी. मगर यांना सांगितली. त्यानंतर शाखाधिकारी मगर, बॅंक कर्मचारी कृष्णा रोडगे यांनी बँकेत धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष माळगे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे.