परभणी जिल्ह्यात बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे २ हजार कोटींचा व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 03:47 PM2018-05-30T15:47:16+5:302018-05-30T15:47:16+5:30
आपल्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीयकृत बँकांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी ३० मे रोजी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील सुमारे २ हजार कोटी रुपयांचा व्यवहार ठप्प झाला आहे़
परभणी - आपल्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीयकृत बँकांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी ३० मे रोजी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील सुमारे २ हजार कोटी रुपयांचा व्यवहार ठप्प झाला आहे़
परभणी जिल्ह्यात १० राष्ट्रीयकृत बँका असून, या बँकांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पगारवाढीसह इतर मागण्यांसाठी ३० मे रोजी संप पुकारला़ सकाळी १० वाजेच्या सुमारास सवृ अधिकारी, कर्मचारी दाखल झाले़ परंतु, या कर्मचाऱ्यांनी कामकाज न करता स्टेट बँक आॅफ इंडियाच्या क्षेत्रीय कार्यालयासमोर निदर्शने केली़ यावेळी इंडियन बँक असोसिएशन व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या़ युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनमध्ये समाविष्ट असलेल्या ९ संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते़ मुख्य प्रतिनिधींनी बँक कर्मचाऱ्यांची सध्याची परिस्थिती व इतर बाबींवर मार्गदर्शन केले़
डॉ़ सुनील टाके, डॉ़ सुनील हट्टेकर, भास्कर विभुते, अशोक पिल्लेवार, सौरभ देगावकर, प्रशांत जोशी, रणजीत काकडे, बालासाहेब साठे, प्रणयकुमार विश्वास, चंद्रकांत लोखंडे यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले़ परभणी जिल्ह्यातील १९ बँकांमधील सुमारे ८०० कर्मचारी या संपात सहभागी झाल्याचा दावा संघटनेने केला आहे़