परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दैनंदिन हजेरीसाठी आता आधारबेस बायोमेट्रिक पद्धत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 12:30 PM2017-10-28T12:30:49+5:302017-10-28T12:36:36+5:30
अधिकारी आणि कर्मचा-यांची काटेकोर उपस्थिती नोंदविण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आता आधारबेस बायोमॅट्रीक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
परभणी : अधिकारी आणि कर्मचा-यांची काटेकोर उपस्थिती नोंदविण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आता आधारबेस बायोमॅट्रीक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक कर्मचा-याच्या आधार क्रमांकावर आधारित हजेरी कर्मचा-यांना नोंदवावी लागणार आहे.
परभणी जिल्ह्यात यापूर्वी विविध शासकीय कार्यालयांमध्ये हजेरी नोंदविण्यासाठी बायोमॅट्रीक यंत्रणा कार्यान्वित केली होती. मात्र बहुतांश कार्यालयातील ही यंत्रणा धूळखात पडली आहे. बायोमॅट्रीक बसविले असले तरी या यंत्रणेवर पगार निघत नव्हता. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचा-यांच्या अनुपस्थितीचे प्रमाण वाढत चालले होते. अनेक शासकीय कार्यालयांमध्ये बायोमॅट्रीक यंत्रणा चक्क गुंडाळून ठेवण्यात आली होती.
कर्मचारी आणि अधिका-यांची उपस्थिती नोंदविण्यासाठी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी आधारक्रमांकावर आधारित बायोमॅट्रीक यंत्रणा कार्यान्वित केली आहे. प्रायोगिक तत्वावर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ही यंत्रणा सुरु करण्यात आली. प्रत्येक कर्मचा-याचे थम इप्रेशन घेऊन आणि आधारक्रमांकाशी लॉगीन करुन हे बायोमॅट्रीक सुरु केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह, महसूल, सामान्य प्रशासन, पुरवठा, भूसंपादन, लेखा, नरेगा, नियोजन अशा सर्व विभागांमध्ये ही बायोमॅट्रिक यंत्रणा सुरु करण्यात आली आहे. प्रत्येक कर्मचा-याला त्याच्या विभागप्रमुखाजवळ असलेल्या संगणकावर आधार क्रमांक टाकून लॉगीन करणे आणि बायोमॅट्रिक यंत्रावर थम करुन हजेरी नोंदविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचा-यांची हजेरी आता आॅनलाईन नोंद होणार आहे. या नवीन पद्धतीमुळे कर्मचा-यांच्या उपस्थितीत पारदर्शकता येणार आहे. जिल्हाधिका-यांनी बायोमॅट्रीक हजेरीसाठी गांभीर्याने सर्व अधिकारी - कर्मचा-यांना सूचना दिल्या आहेत. सध्या ही प्रक्रिया प्रायोगिक तत्वावर असली तरी आणखी आठ दिवसानंतरच कायमस्वरुपी आॅनलाईन हजेरी सुरु केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
दररोज होऊ शकते तपासणी
जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी आधारक्रमांकावर आधारित बायोमॅट्रीक यंत्रणा कार्यान्वित केली आहे. पूर्वीच्या बायोमॅट्रीक आणि या बायोमॅट्रीकमध्ये फरक आहे. जुन्या बायोमॅट्रीक मशीनवर हजेरी नोंदविल्यानंतर विभागप्रमुखाला त्या हजेरीची प्रिंट काढून उपस्थिती तपासावी लागत होती. आता मात्र आधार क्रमांकावर नोंदविलेली हजेरी आॅनलाईन आहे. जिल्हाधिकाºयांसह विभागप्रमुख ही हजेरी केव्हाही तपासू शकतात. त्यामुळे दररोज कोणता कर्मचारी किती वाजता आला, याची माहिती लगेच उपलब्ध होणार आहे.
डिव्हाईस अॅडमीनची नियुक्ती
जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रत्येक शाखेतील एका कर्मचा-याची डिव्हाईस अॅडमीन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचा-याने त्या शाखेतील सर्व अधिकारी आणि कर्मचा-यांचे आधारकार्ड बायोमॅट्रीक प्रणालीशी संलग्न करुन ३१ आॅक्टोबरपर्यंत ते निवासी उपजिल्हधिका-यांकडे सादर करावयाचे आहेत. नोव्हेंबर महिन्याचे वेतन बायोमॅट्रीक प्रणालीच्या उपस्थितीवरुन काढण्याची जबाबदारी संबंधित आहरण व संवितरण अधिका-यांकडे देण्यात आली आहे.
...तर अनुपस्थिती पडेल
जिल्हाधिकारी कार्यालयात सध्या कार्यान्वित केलेली ही यंत्रणा प्रायोगिक तत्वावर आहे. परंतु, १ नोव्हेंबरपासून प्रत्येकाला आधारबेसड् बायोमॅट्रीकवर उपस्थिती नोंदविणे सक्तीचे करण्यात आले असून एखाद्या कर्मचा-याने या पद्धतीचा वापर न केल्यास त्या दिवसाची अनुपस्थिती ग्राह्य धरुन तो दिवस विना वेतन ठरविला जाईल आणि संबंधित अधिकारी व कर्मचा-याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी दिला आहे. त्यामुळे १ नोव्हेंबरपासून सर्व अधिकारी- कर्मचा-यांना या पद्धतीची अंमलबजावणी करावी लागणार आहे