ब्यूटी पार्लर बंद, तर काॅस्मेटिक्सचा वापर कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:18 AM2021-04-28T04:18:52+5:302021-04-28T04:18:52+5:30
शहरातील प्रत्येक काॅलनीत जवळपास १०, तर एकूण शहरात १ हजार ते १२०० ब्यूटी पार्लर आहेत. याद्वारे महिलांना चांगला रोजगार ...
शहरातील प्रत्येक काॅलनीत जवळपास १०, तर एकूण शहरात १ हजार ते १२०० ब्यूटी पार्लर आहेत. याद्वारे महिलांना चांगला रोजगार मिळतो. महिलांच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे ब्यूटी पार्लर. मेकअप, फेशल, फाउंडेशन, फेस पॅक, लिपस्टीक याच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. कोणत्याही सण-समारंभ, लग्न यासह अन्य कार्यक्रमांसाठी महिला ब्यूटी पार्लरला जाऊन सौंदर्य प्रसाधने खरेदी करण्यास पसंती देतात. मागील वर्षीपासून हा व्यवसाय करणाऱ्या महिलांना सततच्या लाॅकडाऊनमुळे व्यवसाय बंद ठेवावा लागत आहे. त्यातच लग्न, साखरपूडा, मुंज आणि अन्य कार्यक्रम अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पाडावे लागत आहेत. यामुळे ब्यूटी पार्लर चालक महिलांना मिळणारे मोठे उत्पन्न जवळपास बंदच झाले आहे. त्यामुळे या महिलांच्या समोर दुकान भाडे, कर्मचारी महिलांचे पगार, बँकेचे हप्ते आणि घेतलेल्या काॅस्मेटिक्सचे झालेले नुकसान याचे पैसे कसे द्यावेत, हाच प्रश्न पडला आहे.
२४ तास घरातच ब्यूटी पार्लर हवे कशाला ?
मागील वर्षी आणलेली काॅस्मेटिक्स अद्याप विक्रीअभावी पडून आहेत. एरव्ही एक-दोन लग्न झाले की नवीन खरेदी करावी लागत होती. सतत लाॅकडाऊनने सर्व बंदच आहे. यामुळे महिला घराबाहेर पडत नाहीत. परिणामी, व्यवसाय करताना अडचणी येत आहेत. माझ्याकडे कार्यरत ब्यूटीशियन महिला आणि कर्मचारी यांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे.
- लता वाजपेयी, ब्यूटी पार्लर व्यावसायिक.
फेब्रुवारीपासून व्यवसाय ठप्प आहे. छोट्या लग्न समारंभामुळे सर्वांत जास्त फटका बसला आहे. कोरोनाची महिलांसह सर्वांनाच भीती आहे. त्यामुळे महिला फारशा येत नाहीत तसेच काॅस्मेटिक विक्री थंडावली आहे.
- अनुराधा तरटे, ब्यूटी पार्लर व्यावसायिक.
घरात राहण्यास पसंती
ब्यूटी पार्लरला जाणे जमत नसल्याने वाईट वाटते. मात्र, वाढता संसर्ग पाहता घरात राहणे सध्या गरजेचे आहे. यामुळे जे आवश्यक आहे, त्याची खरेदी करून घरच्या घरीच मेकअप करणे सध्या महत्त्वाचे आहे.
- रुतुजा मालेवार.
काॅस्मेटिक्सचा वापर सध्या कमी
सतत ब्यूटी पार्लर बंद असल्याने नेहमीपेक्षा काॅस्मेटिक्सचा वापर कमी केला आहे. यातच बाहेर पडणे जमत नसल्याने ब्यूटी पार्लरला जाणे मागील चार महिन्यांत जमले नाही.
- स्मिता डावरे.