ग्रामपंचायतींच्या रणधुमाळीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:14 AM2020-12-23T04:14:32+5:302020-12-23T04:14:32+5:30

परभणी : गावपातळीवरील राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, २३ डिसेंबरपासून प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज ...

Beginning of Gram Panchayat battle | ग्रामपंचायतींच्या रणधुमाळीला सुरुवात

ग्रामपंचायतींच्या रणधुमाळीला सुरुवात

Next

परभणी : गावपातळीवरील राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, २३ डिसेंबरपासून प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार असल्याने गावा-गावात निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने ग्रामीण भागात वातावरण तापू लागले आहे.

ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुका महत्त्वाच्या मानल्या जातात. मागील काही वर्षांपासून राजकीय पक्षांनीही या निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले असून, जास्तीत जास्त ग्रामपंचायती पक्षाच्या ताब्यात घेऊन पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यामुळे या निवडणुकांच्या माध्यमातून गावपुढाऱ्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. यंदाच्या निवडणुकांमध्ये सरपंच पदाचे आरक्षण मतदानानंतर जाहीर केले जाणार असल्याने काही प्रमाणात पॅनलप्रमुखांची गोची झाली आहे. मात्र संभाव्य आरक्षण लक्षात घेऊन पॅनलची रचना केली जात आहे. या निवडणुकीत २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. शक्यतो पॅनलच्या सर्व सदस्यांचे अर्ज एकाच वेळी दाखल केले जातात. त्यामुळे पॅनलमधील सदस्यांच्या कागदपत्रांची जमावा-जमव करणे, आरक्षित जागांवरील सदस्यांचे जात प्रमाणपत्र मिळवण्याचे काम सध्या केले जात आहे.

आजपासून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार असल्याने सोमवारपासूनच ग्रामीण भागात वातावरण तापले आहे. गट तयार करण्यापासून ते गावातील मतदारांंची संख्या, वॉर्डातील संभाव्य उमेदवार यांची गणिते जुळविली जात आहेत. गावातील या राजकारणात राजकीय पक्षांनीही चाचपणी सुरू केली असून, पॅनल प्रमुखांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी गावा-गावात सुरू असून, प्रत्यक्ष अंतिम उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतरच प्रचारात खरी रंगत येणार आहे.

असा आहे ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम

२३ डिसेंबर : उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ

३० डिसेंबर : उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक

३१ डिसेंबर : उमेदवारी अर्जांची छाननी

४ जानेवारी : अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध

१५ जानेवारी : मतदान

१८ जानेवारी : मतमोजणी

चार हजार सदस्यांसाठी निवडणूक जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींमधील ४ हजार सदस्यांसाठी ही निवडणूक होत आहे. परभणी तालुक्यात ८८ ग्रामपंचायतींत २८३ सदस्य निवडले जाणार आहेत. त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यात १०१ ग्रामपंचायतींत ८०९, गंगाखेड ७० ग्रामपंचायतींमध्ये ५९०, मानवत ४१ ग्रामपंचायतींमध्ये ३३९, सेलू ६७ ग्रामपंचायतीमध्ये ५१९, सोनपेठ ३९ ग्रामपंचायतींत ३२९, पूर्णा ६५ ग्रामपंचायतीत ५४१, पाथरी ४२ ग्रामपंचायतींत ३७० आणि पालम तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींमध्ये सदस्यांची निवड केली जाणार आहे.

Web Title: Beginning of Gram Panchayat battle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.