रबी पेरण्यांना सुरुवात; परभणी जिल्ह्यात सव्वा लाख हेक्टर जमिनीवर ज्वारीच्या पेरणीचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 12:57 PM2020-11-12T12:57:56+5:302020-11-12T12:59:15+5:30
जिल्ह्यात यावर्षी अनेक महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे खरीप पिकांना याचा फटका बसला आहे
परभणी : जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने १ लाख १६ हजार ४१९ हेक्टर जमिनीवर रब्बी हंगामाअंतर्गत ज्वारीची पेरणी होण्याचे नियोजन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. सद्यस्थितीत पेरण्यांना शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.
जिल्ह्यात यावर्षी अनेक महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे खरीप पिकांना याचा फटका बसला असला तरी रब्बी हंगामात झालेल्या पावसाचा शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. त्या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पेरण्यांना सुरुवात केली आहे. कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यात १ लाख १६ हजार ४१९ हेक्टर जमिनीवर ज्वारीच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. तर २८ हजार ५७१ जमिनीवर गव्हाची लागवड करण्याचे कृषी विभागाने निश्चित केले आहे.
विशेष म्हणजे, यावर्षी चांगला पाऊस झाल्याने जमिनीमध्ये ओलही अधिक आहे. शिवाय विहीर व बोअर पाणीही चांगले आहे. त्यामुळे गव्हाच्या पिकासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे या पिकाच्या लागवडीत वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय जिल्ह्यात ६३ हजार ६६३ हेक्टर जमिनीवर हरभऱ्याची पेरणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हरभऱ्याचा बाजारात मिळणारा चांगला भाव पाहता या पिकाच्या पेरणीतही वाढ होण्याची शक्यता आहे. या शिवाय रब्बीतील इतर पिकांमध्ये ३ हजार ४९४ हेक्टरवर करडई, ११६ हेक्टरवर जवस, मका २६२८, १७ हेक्टरवर तीळ, ४८ हेक्टरवर सूर्यफूल तर ३ हजार ८३४ हेक्टरवर गळीत धान्याची लागवड होण्याची शक्यता आहे.
२ लाख १५ हजार हेक्टरवर रबीच्या पेरणीची शक्यता
कृषी विभागाने जिल्ह्यात २ लाख १५ हजार ९९१ हेक्टर जमिनीवर रबी हंगामातील पिकांची पेरणी होईल, अशी शक्यता वर्तविली आहे. खरीप हंगामाच्या प्रारंभी बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यातही काही शेतकऱ्यांना फटका बसला. अतिवृष्टी व पूरपरिस्थतीमुळे पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे नदी, ओढे व सखल भागातील जमिनी अनुउत्पादक राहिल्या. रब्बीत या जमिनीचा पेरणीसाठी वापर होणार आहे. त्यामुळे कृषी विभागाने निश्चित केलेल्या क्षेत्रापेक्षा अधिक जमिनीवर पेरा होण्याची शक्यता आहे.