परभणीत घरकुलाच्या ११०० लाभार्थ्यांच्या स्थळ पाहणीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 08:31 PM2018-04-25T20:31:04+5:302018-04-25T20:31:04+5:30
पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पं़स़तील अधिकाऱ्यांनी पावले उचलली असून, मंजूर झालेल्या ११०० लाभार्थ्यांच्या गावात जाऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली जात आहे़
परभणी : पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पं़स़तील अधिकाऱ्यांनी पावले उचलली असून, मंजूर झालेल्या ११०० लाभार्थ्यांच्या गावात जाऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली जात आहे़ दोन गावांमधील स्थळ पाहणी पूर्ण झाली असून, येत्या महिनाभरात सर्व लाभार्थ्यांच्या घरकुलांच्या प्रत्यक्ष बांधकामांना सुरुवात होणार आहे़
रमाई आवास योजनेंतर्गत सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी राज्य शासनाने रमाई आवास योजना अंमलात आणली़ या योजनेंतर्गत परभणी तालुक्याला २०१७-१८ या आर्थिक वर्षामध्ये ११०० घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते़ त्यानुसार तालुक्यातील लाभार्थ्यांनी पंचायत समितीकडे अर्ज दाखल केले़ दाखल झालेले अर्ज मंजुरीसाठी पं़स़ प्रशासनाने सामाजिक न्याय विभागाकडे पाठविले़ या अर्जांना सामाजिक न्याय विभागाकडून मंजुरी मिळाली़ त्यामुळे तालुक्यातील ११०० लाभार्थ्यांना वेळेत घरकुल मिळावे, यासाठी पंचायत समिती गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी ६ एप्रिल रोजी एक पत्रक काढले़ या पत्राद्वारे २०१७-१८ या वर्षातील रमाई आवास योजनेंतर्गत लाभार्थी निवड झालेल्या पात्र यादीनुसार लाभधारकांच्या घराची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून पात्र/अपात्र बाबतचा अहवाल तयार करण्यासाठी विस्तार अधिकारी, शाखा अभियंता व संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली़
या पथकाला नेमून दिलेल्या गावांमध्ये जाऊन रमाई आवास घरकुल योजनेत पात्र लाभार्थ्यांच्या स्थळाची पाहणी करून लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवून पात्र/ अपात्रतेचा अहवाल गटविकास अधिकारी कार्यालयाकडे दाखल करावयाचा आहे़ आतापर्यंत तालुक्यातील भारस्वाडा येथील ३२ व उमरी येथील ९ लाभार्थ्यांच्या स्थळांची पाहणी करून पंचायत समिती प्रशासनाकडे पात्रतेचा अहवाल पाठविला़ त्यानुसार गटविकास अधिकारी कांबळे यांनी भारस्वाडा येथील ३२ पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर रमाई आवास योजनेच्या घरकुलाचा २५ हजारांचा पहिला हप्ता वर्ग केला आहे़ त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून थंड बस्त्यात पडलेल्या रमाई आवास योजनेला पंचायत समिती प्रशसनाने गती दिली आहे़ येत्या काही दिवसांत विस्तार अधिकारी, शाखा अभियंता व ग्रामसेवक यांनी पात्र लाभार्थ्यांची स्थळ पाहणी करून पात्रतेचा अहवाल पं़स़ प्रशासनाला सादर केल्यास सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न साकार होणार आहे़
कागदपत्रातील त्रुटी होणार दूर
रमाई आवास योजनेंतर्गत लाभार्थी निवड झालेल्या पात्र यादीनुसार लाभधारकांच्या घराची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यासाठी विस्तार अधिकारी, शाखा अभियंता व संबंधित गावच्या ग्रामसेवकांचा समावेश आहे़ त्यामुळे लाभार्थ्यांच्या स्थळ पाहणीबरोबरच प्रस्तावातील कागदपत्रांच्या त्रुटीही जागेवरच दूर होणार आहेत़ त्यामुळे येत्या काही दिवसांत सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे़
लाभार्थ्यांना चौथ्या हप्त्याची प्रतीक्षा
रमाई आवास योजनेंतर्गत परभणी तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे़ परंतु, २०१७ पर्यंत ज्या लाभार्थ्यांना लाभ दिला आहे़ त्यापैकी बहुतांश लाभार्थ्यांना चौथ्या हप्त्याची रक्कम मिळाली नाही़ त्यामुळे उसनवारी करून स्वप्नातील घर पूर्णत्वास नेणाऱ्या लाभार्थ्यांना शासनाच्या रमाई आवास योजनेंतर्गत पाडून दिलेल्या चौथ्या हप्त्यातील रकमेची अजूनही प्रतीक्षा आहे़ त्यामुळे याकडे गटविकास अधिकारी यांनी लक्ष देऊन वंचित लाभार्थ्यांना सहाय्य करावे, तसेच थकीत असलेल्या चौथ्या हप्त्याची रक्कम देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे़
स्तुत्य उपक्रम
पंचायत समिती प्रशासनाने लाभार्थ्यांच्या स्थळास भेटी देऊन येणाऱ्या अडचणी सोडून रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ देण्यात येत असल्याने लाभार्थ्यांत समाधान आहे़