Bharat Bandh : परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी शटर डाऊन; भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:44 PM2020-12-08T16:44:40+5:302020-12-08T16:47:58+5:30
Bharat Bandh भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या सत्ताधारी पक्षांसह शेतकरी संघटना, विविध कामगार संघटना आणि सेवाभावी संस्थांनी बंदचे आवाहन केले होते
परभणी : केंद्र शासनाच्या कृषी कायद्यांना विरोध दर्शविण्यासाठी पुकारलेल्या भारतबंदला मंगळवारी परभणी जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, शेतकऱ्यांसाठी विविध पक्ष, संघटना आणि व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बाजारपेठ कडकडीत बंद ठेवली.
भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या सत्ताधारी पक्षांसह शेतकरी संघटना, विविध कामगार संघटना आणि सेवाभावी संस्थांनी बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सकाळपासूनच शहरातील व्यापारपेठ कडकडीत बंद राहिली. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शहरातून मोटारसायकलवरून काहीजणांनी बंदचे आवाहन केले. त्यासही व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
बंदच्या पार्श्वभूमीवर एसटी बस वाहतूक बंद ठेवण्यात आली. त्यामुळे अनेक दिवसानंतर बस स्थानकावर शुकशुकाट पहावयास मिळाला.
दरम्यान, सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास येथील शिवाजी चौकात विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. तीनही कृषी कायदे शेतकरीविरोधी असून ते रद्द करावेत, अशी मागणी करण्यात आली. त्याचप्रमाणे शहरातील बस स्थानक परिसरातील उड्डाणपुलावर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही कार्यकर्त्यांनी मुंडन आंदोलन करून दिल्लीतील शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. सेलू, मानवत, पाथरी, जिंतूर, सोनपेठ या तालुक्यांमध्येही बुधवारी बाजारपेठ कडकडीत बंद राहिली. बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.