भाऊसाहेब मोरे यांनी जयभीमचा नारा पुढे आणला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:51 AM2021-01-08T04:51:59+5:302021-01-08T04:51:59+5:30
परभणी : स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब मोरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत घेतलेली मक्रनपूरची परिषद ऐतिहासिक ठरली असून, या ...
परभणी : स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब मोरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत घेतलेली मक्रनपूरची परिषद ऐतिहासिक ठरली असून, या परिषदेत भाऊसाहेब मोरे यांनी जयभीमचा नारा पुढे आणण्याचे व जाणीव करून देण्याचे काम केले, असे प्रतिपादन भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांनी केले.
मक्रनपूर परिषद व जयभीम दिनानिमित्त येथील विपश्यना केंद्रात प्रथमच ३० डिसेंबर रोजी जयभीम जागर- २०२० कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून भदंत मुदितानंद थेरो, बी. एच. सहजराव, डॉ. बी.टी. धुमतल, ॲड. अमोल गीराम, मिलिंद सावंत, डॉ. वर्षा सेलसुरेकर, प्रा. डॉ. भीमराव खाडे, ज्योती बगाटे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉ. खाडे म्हणाले, भाऊसाहेब मोरे हे शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे सक्रिय कार्यकर्ते होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भाऊसाहेब मोरे यांना पत्र लिहून उपयुक्त माहिती घेत असत. मराठवाड्यात जयभीमचा जयघोष करण्याचे उल्लेखनीय काम भाऊसाहेब मोरे यांनी केले. ज्योती बगाटे म्हणाल्या, जयभीम हा ऊर्जा देणारा, स्वाभिमान वाढविणारा आणि मनाला ताकद देणारा नारा आहे. कार्यक्रमाचे आयोजक भीमप्रकाश गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. गौतम मुंडे यांनी सूत्रसंचालन केले. मंचक खंदारे यांनी आभार मानले. याप्रसंगी प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी संपादित केलेल्या जयभीम स्मरणिकेचे, भूषण मोरे यांच्या विशेषांकाचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी करण गायकवाड, प्रा. डॉ. आनंद मनवर, मंचक खंदारे, भूषण मोरे, सुशील शिंदे, स्वप्निल बोराडे आदींनी प्रयत्न केले.