मोठी बातमी ! बाबाजानी दुर्राणी यांचा राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 11:35 AM2021-11-24T11:35:54+5:302021-11-24T11:38:50+5:30
MLC Babajani Durrani: काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी जि.प. अध्यक्ष राजेश विटेकर यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्याचे संकेत दिले होते. त्यावेळीच पक्षाच्या जिल्हा नेतृत्वात बदल होणार असल्याची चर्चा सुरू झाली.
परभणी : विधानपरिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी (MLC Babajani Durrani ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP ) जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे १६ नोव्हेंबर रोजी दिला असून, बुधवारी या संदर्भात माहिती प्रसिद्धी माध्यमांपर्यंत देण्यात आली. (MLC Babajani Durrani resigns as NCP district president )
परभणी जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची चांगली ताकद आहे. असे असताना गेल्या काही महिन्यांपासून पक्षातील गटबाजी मोठ्या प्रमाणात उफाळून आली होती. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत ही गटबाजी प्रकर्षाने समोर आली. या निवडणुकीत काँग्रेस जिल्हाध्यक्ष आ.सुरेश वरपूडकर यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील सदस्यांचे पॅनल उभे करण्यात आले होते. याविरोधात भाजपाचे माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर यांचे पॅनल होते. जिल्हा बँकेवर गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.सुरेश वरपूडकर यांचे वर्चस्व आहे. परंतु आ.दुर्राणी यांचा बँकेच्या जिल्हाध्यक्षपदावर डोळा होता. त्यामुळे त्यांनी भाजपाच्या पॅनलमध्ये जाणे पसंत केले. याच पॅनलमधून ते व त्यांच्या समर्थकांनी निवडणूक लढविली. या निवडणुकीत आ.वरपूडकर यांच्या पॅनलने एकतर्फी विजय मिळविला.
वरपूडकर यांच्यासोबत शिवसेनेचे खासदार बंडू जाधव, राष्ट्रवादीचे जिंतूरचे माजी आ.विजय भांबळे, गंगाखेडचे माजी आ.मधुसुदन केंद्रे, माजी जि.प. अध्यक्ष राजेश विटेकर हे होते. येथूनच आ.दुर्राणी व राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांमध्ये वरपूडकर यांच्या पॅनलसोबत गेल्याच्या कारणावरुन वाद निर्माण झाला. त्यानंतर माजी आ.विजय भांबळे, माजी आ.केंद्रे, माजी जि.प. अध्यक्ष विटेकर यांच्यासोबतचे मतभेद प्रकर्षाने समोर आले. परभणीचे माजी महापौर प्रताप देशमुख यांच्यासोबत यापूर्वीच आ.दुर्राणी यांचे परभणी मनपातील निवडणुकीच्या कारणावरुन मतभेद होते. पक्षातील ही गटबाजी गेल्या काही दिवसांपासून सुरूच होती. ही माहिती पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचली. परंतु पक्षश्रेष्ठींनी यात हस्तक्षेप केला नाही.
अशातच २४ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील परभणी दौऱ्यावर आले. परभणी दौऱ्यात त्यांनी पक्षाच्या घेतलेल्या आढावा बैठकीत पक्षाच्या सर्व सेलच्या जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष यांची पक्ष बांधणीकडे दुर्लक्ष झाल्याच्या कारणावरुन कानउघडणी केली. पक्ष वाढीसाठी कार्य न करणाऱ्यांचे तात्काळ राजीनामे घेण्यात यावेत, असे त्यांनी सांगितले. शिवाय आगामी निवडणुकीत उमेदवारी मिळेल, असा समज करुन घेऊ नका. लोकांच्या मनात चांगली प्रतिमा निर्माण करुन पक्षसंघटन वाढवा, असा सल्ला दिला. नामधारी पदे घेऊन बसू नका, यापुढे प्रत्येकावर माझे वैयक्तिक लक्ष राहणार आहे, असे त्यांनी यावेळीच्या भाषणात सांगितले होते. त्यानंतरही पक्ष संघटन पातळीवर फारशा घडामोडी झाल्या नाहीत. दुसरीकडे माजी महापौर प्रताप देशमुख यांच्या समर्थकांनी परभणी शहराध्यक्ष पदाची मागणी लावून धरली. त्यानंतर पक्षश्रेष्ठींनी देशमुख यांना शहराध्यक्ष पद देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ते पूर्ण होत नसल्याने देशमुख यांच्या अनेक समर्थकांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर आ.दुर्राणी यांचे समर्थक किरण सोनटक्के यांच्याकडे असलेले परभणी शहराध्यक्षाचे पद काढून ते प्रताप देशमुख यांना देण्यात आले.
प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी दिले होते बदलाचे संकेत
या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर सोनपेठ न.प.चे काँग्रेसचे गटनेते चंद्रकांत राठोड यांनी काही दिवसांपूर्वी विटेकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत मुंबईत प्रवेश केला. त्यावेळी झालेल्या भाषणात प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी माजी जि.प. अध्यक्ष राजेश विटेकर यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्याचे संकेत दिले होते. त्यावेळीच पक्षाच्या जिल्हा नेतृत्वात बदल होणार असल्याची चर्चा सुरू झाली. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर १६ नोव्हेंबर रोजी आ.बाबाजानी दुर्राणी यांनी पक्षाकडे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. ही बाब जाहीर करण्यात आली नाही. पक्षीय पातळीवरही याबाबत काहीही घटना घडल्या नाहीत. त्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी याबाबतची माहिती प्रसिद्धी माध्यमांपर्यंत पोहोचविण्यात आली.
राष्ट्रवादीच्या ताब्यातील जि.प. कारभाराची दुर्राणी यांच्याकडून तक्रार
जवळपास गेल्या दहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. सध्या माजी जि.प. अध्यक्ष राजेश विटेकर यांच्या आई निर्मलाताई विटेकर या जि.प.च्या अध्यक्ष आहेत. असे असताना जि.प.च्या कारभाराबाबत सोनपेठ येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाची इमारत पाडल्याच्या कारणावरुन आ.दुर्राणी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. शिवसेनेचे खा.बंडू जाधव यांनीही याबाबत तक्रार केली होती. शिवाय सोनपेठ येथील काही जणांनी याविरोधात जि.प.समोर उपोषणही केले होते. ही बाबही पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचली होती.