शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कीडीस प्रतिकारक, लवकरच उगवणारे सोयाबिनचे वाण विकसित
By मारोती जुंबडे | Published: February 13, 2024 11:17 AM2024-02-13T11:17:52+5:302024-02-13T11:20:02+5:30
वनामकृविच्या ७ वाणासाठी राज्य बियाणे समितीची शिफारस; शेती पिकांचे पाच, भाजीपाल्याच्या दोन वाणाचा समावेश
परभणी : राज्य बियाणे उपसमितीची ५३ वी बैठक ८ फेब्रुवारी रोजी राज्याचे अपर मुख्य सचिव (कृषी) अनुप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या शेती पिकांचे पाच वाण आणि भाजीपाला पिकांचे दोन वाण असे एकूण सात वाणास केंद्रीय बियाणे समिती (भारत सरकार) यांना अधिसूचित करण्याची शिफारस करण्यात आली.
या सात वाणात सोयाबीनचे एमएयूएस ७३१, अमेरिकन कापसाच्या एनएच ६७७, हरभरा देशी वाण परभणी चना १६, खरीप ज्वारीच्या परभणी शक्ती, तीळ पिकाच्या टीएलटी १० तसेच मिरचीचा पीबीएनसी १७ व टोमॅटोचा सरळ वाण पीबीएनटी २० याचा समावेश आहे. सोयाबीनचा एमएयूएस ७३१ हा वाण अधिक उत्पन्न देणारा (हेक्टरी २८-३२ क्विंटल) असून विविध कीड रोगास मध्यम प्रतिकारक, लवकर येणारा, मराठवाडा विभागासाठी लागवडीसाठी शिफारस करण्यात आला आहे.
अमेरिकन कापूस प्रसारित वाण एनएच ६७७ यांचे जिराईत मधील उत्पादन क्षमता हेक्टरी १२ ते १४ क्विंटल प्रति हेक्टर काढणीचा कालावधी १५० ते १६० दिवस आहे, हा वाण जिवाणूजन्य तसेच बुरशीजन्य रोग व रस शोषणाऱ्या किडीस प्रतिकारक आहे. हे वाण महाराष्ट्र राज्यातील कोरडवाहू कापूस लागवड असलेल्या भागासाठी शिफारसीत करण्यात आला आहे. हे वाण बदलत्या हवामान परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहेत. हे सात वाण प्रसारण करण्यासाठी संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर व विद्यापीठातील पीक पैदासकारांचे कुलगुरू डॉ. इन्द्र मणी यांनी सत्कार केला.
परभणी चना १६
हरभरा देशी वाण हा अधिक उत्पन्न देणारा, मर रोगास प्रतिकारक, यांत्रिकीसाठी सुलभ, टपोऱ्या दाण्याचा, मराठवाडा विभागासाठी शिफारसीत करण्यात आला आहे.
टीएलटी १०
तीळ पिकात हा अधिक उत्पन्न देणारा टपोरा पांढरा दाणा, महत्वाच्या कीड व रोगास मध्यम प्रतिकारक असून महाराष्ट्रासाठी खरीप व उन्हाळी हंगामास लागवडीसाठी शिफारस करण्यात आला आहे.
परभणी शक्ती
ज्वारीचा खरीप हंगामातील परभणी शक्ती हा वाण धान्यामध्ये अधिक लोह (४२ मिली ग्रॅम / किलो) व अधिक जस्त (२५ मिली ग्रॅम / किलो) असणारा व धान्याचे उत्पादन २२ ते २५ क्विंटल प्रति हेक्टर एवढी उत्पादकता आहे. कडब्याचे ५२ ते ५५ क्विंटल प्रति हेक्टर एवढी उत्पादकता असणारा वाण महाराष्ट्रासाठी रब्बी हंगामात लागवडीची शिफारस करण्यात आला आहे.
मिरची पीबीएनसी १७
मिरचीचा पीबीएनसी १७ हा वाण हिरवी मिरचीचे अधिक उत्पादन देणारा ५३१ ते ५४६ क्विंटल प्रति हेक्टर, मराठवाडा विभागासाठी खरीप हंगामामध्ये लागवड करण्याची शिफारस करण्यात येत आहे. हा वाण लिफकर्ल व ॲथ्राकनोझ रोगास मध्यम सहनशील आहे.
पीबीएनटी २०
टोमॅटोचा सरळ वाण पीबीएनटी २० हा वाण रब्बी हंगामामध्ये मराठवाडा विभागास लागवड करण्याची शिफारस करण्यात येत आहे. या वाणाची उत्पादन क्षमता ६१४ ते ६२० क्विंटल प्रति हेक्टर एवढी आहे. या वाणाच्या फळाचा आकार गोल व गडद्द लाल रंग असून प्रति फळाचे वजन ६० ते ६५ ग्रॅम आहे. लागवडीनंतर ६० ते ६५ दिवसांनी फळाची पहिली काढणीस येते. हा वाण लिफकर्ल व फळामधील अळी, पांढरी माशी व फुल किडे या किडीस मध्यम सहनशील आहे.