वाहनांवर कारवाई करणाऱ्या फौजदारास धमकावणारा भाजप पदाधिकारी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 03:39 PM2021-06-22T15:39:19+5:302021-06-22T15:40:59+5:30
सहायक पोलीस निरीक्षक राजाभाऊ चव्हाण हे १९ जून रोजी धमधम ते बामणी या रस्त्यावर मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत असताना भाजपचे खंडेराव आघाव यांनी त्यांना फोन केला.
बामणी (जि. परभणी): येथील सहायक पोलीस निरीक्षक राजाभाऊ चव्हाण यांना मोबाइलवरून धमकी दिल्याप्रकरणी भाजपच्या किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष खंडेराव आघाव यांच्याविरुद्ध बामणी पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, सोमवारी दुपारी त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक राजाभाऊ चव्हाण हे १९ जून रोजी धमधम ते बामणी या रस्त्यावर मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत असताना भाजपचे खंडेराव आघाव यांनी त्यांना फोन केला. वाहनांवर कारवाया करून लोकांना त्रास का देता, अशी विचारणा करत नोकरी घालवण्याची धमकी फोनवरून दिली तसेच प्रतिबंधक कारवाया करू नये, यासाठी धमकी देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला, अशी फिर्याद चव्हाण यांनी दिली आहे. त्यावरून खंडेराव आघाव यांच्याविरुद्ध २१ जून रोजी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सदानंद मेंडके हे तपास करत आहेत. दरम्यान, २१ जून रोजी दुपारी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने जिंतूर येथून खंडेराव आघाव यांना अटक केली आहे.
.............