भाजपच्या पंचायत समिती सदस्या पुष्पाबाई जाधव यांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 03:28 PM2021-09-10T15:28:52+5:302021-09-10T15:30:43+5:30
नळणी गटातील नळणी बु. गणातुन पूष्पाबाई या भाजपाकडून निवडणूक आल्या
भोकरदन ( जालना ) : केदारखेडा- भाजपाच्या नळणी गणातील पंचायत समिती सदस्या पुष्पाबाई गजानन जाधव ( ३५ ) यांनी गुरुवारी रात्री रहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही.
२०१६ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद- पंचायत समिती निवडणुकीत नळणी गटातील नळणी बु. गणातुन पूष्पाबाई या भाजपाकडून निवडणूक आल्या होत्या. गुरुवारी ( दि. ९ ) रात्री पती व दोन मुलांनी जेवण केले. पती गजानन जाधव व मुलगा घराच्या चबुतऱ्यावर झोपले तर मुलगी काकांच्या घरी झोपायला गेली. पुष्पाबाई जाधव घरात एकट्या झोपल्या होत्या. मध्यरात्री पुष्पाबाई यांनी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी झोपेतून उठल्यानंतर गजानन जाधव यांनी पुष्पाबाई यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आहे. त्यांनी आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
घटनेची माहिती भोकरदन पोलीस ठाण्याचे सपोनि रत्नदीप जोगदंड यांना देण्यात आली. त्यांनी पोलिस उपनिरीक्षक बी डी कोठुबरे यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा केला. भोकरदन पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुष्पाबाई जाधव यांच्या पार्थिवावर नळणी येथे शोकाकूळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, दिर-भावजाई, पुतणे असा परिवार आहे.