प्रतिकात्मक पुतळ्याच्या दहनापूर्वीच भाजप आंदोलकांना घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:22 AM2021-07-07T04:22:04+5:302021-07-07T04:22:04+5:30
५ जुलै रोजी विधानसभेत भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले. या प्रकारामुळे शहरातील भाजप कार्यकर्त्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला ...
५ जुलै रोजी विधानसभेत भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले. या प्रकारामुळे शहरातील भाजप कार्यकर्त्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, त्यातूनच ६ जुलै रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भाजपाचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे, मनपातील गटनेत्या मंगलताई मुदगलकर, मोहन कुलकर्णी, सुनील देशमुख, समीर दुधगावकर, सुरेश भुमरे, रामदास पवार, विजय गायकवाड, मोहन कुलकर्णी, दिनेश नरवाडकर, नगरसेवक मधुकर गव्हाणे, शिवाजी शेळके आदी कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात एकत्र आले. राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भाजपाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.
याचवेळी भाजप आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याची तयारी सुरू झाली. ही बाब पोलिसांना समजताच पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन आंदोलनापासून परावृत्त केले. साधारणतः अर्धा ते पाऊण तास चाललेल्या या धरपकडीमुळे आंदोलनस्थळी एकच गोंधळ निर्माण झाला होता. या आंदोलनादरम्यान नवामोंढा पोलिसांनी भाजपचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे, सुनील देशमुख, समीर दुधगावकर यांच्यासह ५० ते ६० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.