भाजपला विरोधी पक्षच नकोय; देशभरात नैराश्येचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 05:27 AM2019-08-28T05:27:13+5:302019-08-28T05:27:24+5:30
जिग्नेश मेवाणी यांचा आरोप
परभणी : काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा करणाऱ्या भाजपाला देशात विरोधी पक्षच नको आहे आणि त्या दृष्टीनेच पावले उचलली जात आहेत़ विरोधी पक्ष क्षीण झाले असून, देशभरात नैराश्येचे वातावरण आहे़ त्यामुळे जनतेलाच आता विरोधी भूमिका घ्यावी लागेल, असे मत गुजरातेतील आ़ जिग्नेश मेवाणी यांनी येथे व्यक्त केले़
राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या माध्यमातून जिग्नेश मेवाणी यांनी ‘संविधान बचाव देश बचाओ’ या अभियानांतर्गत संविधान सन्मानयात्रा सुरू केली आहे़ मंगळवारी ही यात्रा परभणीत दाखल झाली़ यानिमित्ताने आ़ मेवाणी यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ ते म्हणाले, २ कोटी लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते़ मात्र प्रत्यक्षात त्या उलट परिस्थिती निर्माण झाली आहे़ देशभरात मंदीची लाट आहे़ विविध कंपन्या रोजगार देण्याऐवजी असलेल्या कर्मचाऱ्यांना काढत आहेत़ त्यामुळे रोजगार देण्याऐवजी रोजगार हिसकावून घेतला जात आहे, ‘हेच का अच्छे दिन’? गुजरात मॉडेलचा कांगावा केला जात आहे़ परंतु, या बहकाव्यात राज्यातील नागरिकांनी येऊ नये. २२ वर्षांत देशात ३ लाख शेतकºयांनी आत्महत्या केल्या. मात्र मोदी यांना शेतकºयांच्या आत्महत्येशी देणे घेणे नसल्याचे दिसत आहे़ या राज्यात संविधान मोडून काढणे आणि त्या जागी मनुस्मृतीचा अवलंब करणे ही एकमेव संघप्रणित कार्यप्रणाली सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला़