युतीत जागा सेनेला सुटल्याने गंगाखेडच्या भाजपा पदाधिकाऱ्यांचा आत्मक्लेष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 07:04 PM2019-10-01T19:04:31+5:302019-10-01T19:11:10+5:30
टाळ, मृदंगाच्या गजरात भजन करीत आत्मक्लेष आंदोलन
गंगाखेड: भाजपा, शिवसेना, रासपा, रिपाइंच्या महायुतीत गंगाखेड विधानसभेची जागा शिवसेनेला सोडून भाजपच्या वरिष्ठांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांवर अन्याय केल्याचे सांगत मंगळावारपासून (दि. १) शहरातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी संत जनाबाई मंदीरात आत्मक्लेष आंदोलन सुरू केले आहे.
परभणी जिल्हयातील भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला असलेल्या गंगाखेड विधानसभा मतदार संघाची उमेदवारी देतांना विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्या भाजपाच्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांवर अन्याय करत भाजपाकडील ही जागा मित्र पक्ष शिवसेनेला सोडून वरिष्ठांनी आमच्यावर अन्याय केला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एक निष्ठेने काम करीत विजय प्राप्त करण्यासाठी जीवाचे रान करून सुद्धा उमेदवारी देतांना गंगाखेड विधानसभेबाबत वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णयावर फेरविचार व्हावा यासाठी दि. १ ऑक्टोबर मंगळवार रोजी संत जनाबाई मंदिरात सर्व पदाधिकाऱ्यांनी आत्मचिंतन करण्याकरिता टाळ, मृदंगाच्या गजरात भजन करीत आत्मक्लेष सुरू केले आहे.
निर्णयाचा फेरविचार करावा
वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णयावर फेरविचार होत नाही तोपर्यंत हे आत्मक्लेष असेच सुरू राहणार असल्याचे सर्वच पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने सांगितले. यामध्ये प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव रबदडे, विधानसभा प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष रामप्रभु मुंडे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. सुभाष कदम, गणेशराव रोकडे, संघटन मंत्री बाबासाहेब जामगे, बालाजी देसाई, अॅड. व्यंकटराव तांदळे, नंदकुमार सुपेकर, गोविंद रोडे, विश्वनाथ अप्पा सोळंके, आनंदराव बनसोडे, कृष्णा सोळंके, सत्यनारायण गव्हाणकर, श्रीनिवास मोटे, रामराजे फड, सुनिल छाजेड, जगन्नाथ आंधळे, भास्करराव भिसे, सचिन लटपटे, मच्छिंद्र नवघरे, ज्ञानेश्वर डाके, संतोष टोले, प्रशांत फड, मनोज मुरकुटे, ओम आंधळे, शिवराज गुट्टे आदींसह गंगाखेड, पालम व पूर्णा तालुक्यातील बहुसंख्य पदाधिकारी सहभागी झाले होते.
विशेष म्हणजे, भाजपा पदाधिकाऱ्यांच्या आत्मक्लेष आंदोलनात शिवसेनेतर्फे विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक असलेले शिवसेनेचे विधानसभा प्रमुख बालासाहेब निरस यांच्याबरोबरच रासपाचे जिल्हा परिषद सदस्य किशनराव भोसले, वसंतराव चोरघडे, सुरेश नळदकर यांनीही आपली उपस्थिती लावली होती.