परभणीत भाजपाचा मेळावा :बुथ रचनेच्या जोरावरच जिंकल्या निवडणुका- रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:25 AM2018-06-25T00:25:44+5:302018-06-25T00:25:59+5:30

भाजपाला विजयापासून रोखण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र झाले आहेत़ परंतु, भाजपाची बुथ रचना मजबुत असल्याने आजपर्यंत एक-एक करीत २२ राज्यात भाजपाचे सरकार स्थापन झाले़ त्यामुळे परभणी जिल्ह्यात बुथ रचना मजबूत करा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष खा़रावसाहेब दानवे यांनी केले़

BJP's rally in Parbhani: Elections won by the formation of Buddha: Ravsaheb Danwe | परभणीत भाजपाचा मेळावा :बुथ रचनेच्या जोरावरच जिंकल्या निवडणुका- रावसाहेब दानवे

परभणीत भाजपाचा मेळावा :बुथ रचनेच्या जोरावरच जिंकल्या निवडणुका- रावसाहेब दानवे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : भाजपाला विजयापासून रोखण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र झाले आहेत़ परंतु, भाजपाची बुथ रचना मजबुत असल्याने आजपर्यंत एक-एक करीत २२ राज्यात भाजपाचे सरकार स्थापन झाले़ त्यामुळे परभणी जिल्ह्यात बुथ रचना मजबूत करा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष खा़रावसाहेब दानवे यांनी केले़
परभणी विधानसभा मतदार संघाचा बुथ मेळावा आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती रविवारी शहरातील श्रीकृष्ण गार्डन मंगल कार्यालयात साजरी करण्यात आली़ याप्रसंगी अध्यक्षपदावरून खा़दानवे बोलत होते़ कार्यक्रमास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, आ़मोहन फड, भाजपाचे संघटन मंत्री विजय पुराणिक, भाऊराव देशमुख, भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, जिल्हाध्यक्ष अभय चाटे, माजी आ़विजय गव्हाणे, मेघनाताई बोर्डीकर, विठ्ठल रबदडे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भुमरे, भाई ज्ञानोबा मुंडे, मीनाताई परतानी, खंडेराव आघाव, सुधीर कांबळे, प्रमोद वाकोडकर, मंगल मुदगलकर, मधुकर गव्हाणे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती़
खा़दानवे म्हणाले, केंद्र आणि राज्यात भाजप सरकारने अनेक योजना राबविल्या़ या कल्याणकारी योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा. ग्रामीण भागात गाव, सर्कल मजबूत असेल तर कुठलीही निवडणूक अवघड नाही़ कार्यकर्त्यांनी गावा-गावात जाऊन मागील सरकारची कामे आणि या सरकारने केलेली कामे याची तुलना करून शेवटच्या घटकापर्यंत सरकारच्या चांगल्या कामांची माहिती द्या, असे आवाहन त्यांनी केले़ पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर म्हणाले, देशात, राज्यात भाजपाची सत्ता असताना परभणी जिल्ह्यात मात्र आपण विरोधी पक्षात आहोत़, याची खंत आहे़ असे असतानाही केंद्र व राज्य शासनाने जिल्ह्याला भरघोस निधी दिला़ आजपर्यंत ३ लाख लोकांना शासनाच्या योजनेचा लाभ देणारा परभणी हा देशातील एकमेव जिल्हा असल्याचेही ते म्हणाले़
प्रारंभी प्रास्ताविकात महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे म्हणाले, मागील परभणी विधानसभा निवडणुकीत भाजपाने दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. अल्पमताने पराभव पत्करावा लागला. परंतु, २०१९ ची निवडणूक भाजपाकडून लढवून ती विजयी करून दाखवेल, असा विश्वास भरोसे यांनी व्यक्त केला़ जिल्ह्याला विभागीय आयुक्त कार्यालय मंजूर करावे, राष्ट्रीय महामार्गावर झरी, राहटी येथे बंधारावजा पूल मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केली़ सुरेश भुमरे यांनीही मनोगत व्यक्त केले़ कार्यक्रमात १ हजार महिलांना प्रातिनिधीक स्वरुपात गॅस शेगड्यांचे वाटप करण्यात आले़ तसेच पहेलवान सुनील गडदे, रावसाहेब धर्मे, पहेलवान राजू डिघोळे यांचा सत्कार करण्यात आला़ प्रा.सुनील तुरुकमाने यांनी सूत्रसंचालन केले. संजय शेळके यांनी आभार मानले.
भाजपा लढविणार : विधानसभेच्या सर्व जागा
आगामी काळात युती झाली नाही तर परभणी लोकसभा मतदार संघातील विधानसभेच्या चारही जागा स्वबळावर लढविण्याची तयारी भाजपाने केली असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी यावेळी दिली. लोणीकर म्हणाले, परभणी जिल्ह्यात यापूर्वी भाजपाची ताकद कमी होती़ परंतु, आता परिस्थिती बदलली आहे़ जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे. भाजपने बुथनिहाय रचना केली असून, या रचनेच्या बळावर आगामी लढाई कार्यकर्त्यांना जिंकायची आहे़ युती संदर्भातील निर्णय होत राहतील़ मात्र परभणी लोकसभा मतदार संघातील चारही विधानसभेच्या जागा संपूर्ण ताकदीने लढविण्याची तयारी केली आहे. कार्यकर्त्यांनी बुथरचना मजबूत करावी. कार्यकर्त्यानी एकत्र येऊन कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले़
बुथ मजबूत करा-पाटील
बुथ रचनेच्या बळावरच भाजपाची ताकद वाढणार आहे़ त्यामुळे देश पातळीवर भाजपने बुथ रचना तयार केली, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक बुथवर १० ते १२ कार्यकर्त्यांची नियुक्ती केली आहे़ या कार्यकर्त्यांनी मतदारापर्यंत पोहोचून त्यांना सरकारची कामे पटवून द्यावीत, बुथ अंतर्गत असलेल्या मतदारांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवाव्यात, चार वर्षांत सरकारने काय केले ते पटवून द्यावे, असे आवाहन करतानाच बुथ मजबूत करा, बुथ प्रमुखांना मान द्या, असा सल्लाही त्यांनी दिला़

Web Title: BJP's rally in Parbhani: Elections won by the formation of Buddha: Ravsaheb Danwe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.